पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मसी दिना’ निमित्त पंढरपूर शहरामध्ये भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या माध्यमातून ‘आरोग्याची जपणूक करा’ असा बहुमोल संदेश देण्यात आला. या बाईक रॅलीला पंढरपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या रॅलीचे जागोजागी स्वागत करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करता आला नाही त्यामुळे या बाईक रॅलीमध्ये सर्व फार्मासिस्टनी उत्साहाने सहभाग घेतला. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते नारळ फोडून या भव्य रॅलीचे उदघाटन करण्यात आले.
प्रारंभी उल्हास खटावकर यांनी फार्मासिस्टच्या कर्तव्य प्रतिज्ञेचे वाचन केले तर सर्व उपस्थित फार्मासिस्टस व नागरिकांनी फार्मसीची शपथ घेतली. भक्तिमार्गावरील केमिस्ट भवन पासून रॅलीला सुरुवात झाली. ‘निरोगी जगासाठी फार्मसी एकत्रित काम करते’ या मुख्य विषयावर जनजागृती करण्यासाठी व जागतिक फार्मसी दिनाचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने पंढरपूर शहरामध्ये या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर तालुक्यातील जवळपास तिनशे फार्मासिस्टस नी या रॅलीत सहभाग घेतला होता. महिलांनी गुलाबी तर पुरुषांनी भगवे फेटे परिधान केले होते. भक्तिमार्ग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वीर सावरकर चौक, जुने एसटी स्टँड, नवीन एसटी स्टॅन्ड, स्व. इंदिरा गांधी चौक, भोसले चौक, पंढरपूर अर्बन बँक, भादुले चौक, गांधी चौक, भजनदास चौक, कालिका देवी मंदिर, छत्रपती संभाजी चौक, काळा मारुती, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड मार्गे पुन्हा भक्ती मार्गावर येऊन या रॅलीची सांगता करण्यात आली.
यामध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील जवळपास तीनशे फार्मासिस्ट, औषध विक्रेते, स्वेरी संचलित फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅली पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या रॅली मध्ये वाहतूक पोलिसांचे देखील उत्तम सहकार्य लाभले. रॅलीच्या माध्यमातून फार्मासिस्टसनी नागरिकांमध्ये आरोग्य व औषधांविषयी जनजागृती केली. आरोग्याविषयी काळजी घ्यावी यासाठी उद्घोषणा करण्यात आल्या.
या भव्य बाईक रॅली मध्ये पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे, जेष्ठ मार्गदर्शक सतिश सादिगले, श्रीरंग बागल, गोवर्धन भट्टड, सचिव महादेव जाधव, खजिनदार श्रीरंग राहीरकर, पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे इतर पदाधिकारी तसेच स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूरचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली.) पंढरपूरचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, डॉ. वृणाल मोरे, प्रा. रामदास नाईकनवरे, डॉ. अनिल लांडगे, प्रा. हेमंत बनसोडे यांच्यासह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.