पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी व भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. या काळात वारकऱ्यांना आरोग्य सेवा व वैद्यकीय मदत पुरविण्यात आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या आशा स्वयंसेविकांच्या मासिक मानधनात वाढ करून ते किमान २० हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी डॉ. सौ. प्रणिता भगीरथ भालके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आशा स्वयंसेविका ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सातत्याने कार्यरत असतात. विशेषतः आषाढी व कार्तिकी वारीच्या कालावधीत लाखो वारकऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. सध्या त्यांना मिळणारे सुमारे १३ हजार रुपयांचे मासिक मानधन त्यांच्या कामाच्या स्वरूपाच्या तुलनेत अपुरे असून, त्यांच्या मेहनतीचा, सेवाभावाचा आणि योगदानाचा विचार करून मानधनात वाढ करणे आवश्यक असल्याचे डॉ. भालके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच वारीच्या कालावधीत विशेष आरोग्य सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविकांना नियमित मानधनाव्यतिरिक्त स्वतंत्र प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
सामान्य जनतेचे प्रश्न, सामाजिक बांधिलकी आणि शहराचा सर्वांगीण विकास या तिन्ही बाबींना प्राधान्य देत काम करण्याची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनदरबारी मांडण्याचा त्यांचा पुढाकार हा त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे आणखी एक उदाहरण ठरत आहे.

