पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ गायकवाड यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. त्यांच्यावर उपचार करून त्यांना कायमस्वरूपी पेसमेकर (Permanent Pacemaker) बसविण्यात आला. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीर परिस्थिती असताना सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयच्या नेत्यांनी त्यांची साधी विचारपूस तरी केली का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
रामभाऊ गायकवाड हे केवळ पक्षाचे पदाधिकारी नव्हते, तर आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू, लढाऊ आणि कार्यकर्त्यांना समजून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला. अन्यायाविरोधात आंदोलने, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न आणि चळवळीतील सक्रिय सहभाग ही त्यांची ओळख राहिली आहे.
माजी तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि चळवळीच्या विचारांशी प्रामाणिक राहणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
मात्र, पक्षासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्याची प्रकृती गंभीर असताना पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांची गरज असते; मात्र संकटाच्या काळात त्याच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीदेखील नेतृत्वाची जबाबदारी आहे.
कार्यकर्त्यांचा सन्मान केवळ पदावर असतानाच करायचा का? चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांची अडचणीच्या काळात विचारपूस करणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही पक्षाची नैतिक जबाबदारी नाही का, अशी भावना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
रामभाऊ गायकवाड यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी अपेक्षा त्यांच्या हितचिंतकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयच्या वरिष्ठ नेत्यांनी या निष्ठावंत कार्यकर्त्याची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
चळवळ उभी राहते ती नेत्यांमुळेच नव्हे, तर तळागाळात निष्ठेने लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घामातून आणि संघर्षातून. अशा कार्यकर्त्यांना संकटाच्या काळात विसरले जाणे ही निश्चितच आत्मपरीक्षण करण्याची बाब आहे.

