पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
लोकमान्य विद्यालयामध्ये पीएम श्री (PM SHRI) शाळांमध्ये नाविन्यपूर्ण संस्कृती आणि उद्योजकतेचा विकास (DICE) या उपक्रमांतर्गत शाळा नाविन्य परिषद आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचारसरणी, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच उद्योजकतेची भावना विकसित करणे हा आहे.
या कार्यक्रमामध्ये सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथील डॉ. अतुल आराध्ये सर यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता नवीन कल्पना मांडणे, त्या कल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग करणे आणि समाजाच्या गरजा ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. अतुल आराध्ये सर यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय करणे नसून, एखादी समस्या ओळखून तिच्यावर प्रभावी आणि उपयुक्त उपाय शोधण्याची मानसिकता असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील समस्या, शाळा, गाव, शेती, पाणी, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांतील गरजा ओळखून त्यावर नवीन संकल्पना विकसित कराव्यात, असे त्यांनी आवाहन केले.
तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय, निरीक्षणशक्ती, कल्पकता, टीमवर्क, नेतृत्वगुण आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखादी कल्पना छोटी असली तरी तिच्यामध्ये मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्या प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश त्यांनी दिला.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना, समस्या-निराकरण, प्रकल्पाधारित शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी याबाबत नवीन दृष्टिकोन मिळाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध प्रश्न विचारले व डॉ. अतुल आराध्ये सर यांच्याशी संवाद साधला.
DICE शाळा नाविन्य परिषद हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असून, भविष्यातील नवउद्योजक, संशोधक, नवकल्पक आणि नेतृत्वक्षम नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये “विचार करा – कल्पना करा – प्रयोग करा – नवसर्जन करा” हा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथील डॉ. अतुल आराध्ये यांचे लोकमान्य विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक आराध्ये यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला व श्री मिसाळ सर यांनी आभार मानण्यात आले. हा उपक्रम सिंहगड कोर्टी,पंढरपूर चे संचालक व प्राचार्य डॉ.कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने संपन्न झाला.

