वाडीकुरोली (ता.पंढरपूर) स्वप्नील जमदाडे तेज न्यूज
वसंतराव काळे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, वाडीकुरोली येथे सन 2026-27 च्या पंढरपूर तालुकास्तरीय शालेय मुलींच्या खो-खो क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे आयोजन वाडीकुरोली प्रशालेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. वसंतदादा काळे यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य संजय कुलकर्णी यांनी केले. यावेळी क्रीडा कार्यालय प्रमुख मोहन यादव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना "मोठे बनायचे असेल तर मैदान सोडायचे नाही" असा मोलाचा सल्ला दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. राजकुमार देशमुख (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, RTO सोलापूर) यांनी "आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मैदानाचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. जे क्रीडा स्पर्धेत सहभागी होतात त्यांचे आयुष्य नक्कीच उज्ज्वल आहे," असे प्रतिपादन केले.
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.कल्याणरावजी काळे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात "आता केलेले कष्ट भविष्यात यश मिळवून देतात. भविष्यात सावली पाहिजे असेल तर आत्ता उन्हात कष्ट करावे लागेल," असे सांगत खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी, संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच स्पर्धेसाठी आलेले विविध शाळांचे खो-खो संघ, त्यांचे शिक्षक व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप लिंगे, मेघा कौलगे व तात्यासाहेब सरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक कुमार गाजरे यांनी केले.

