पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (ISNT) स्टुडंट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (NDT) या विषयावर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ASNT NDT Level III प्रमाणित तज्ज्ञ श्री. यतिन आर. सोंजे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना NDT तंत्रज्ञान, त्याचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व, आधुनिक तपासणी पद्धती आणि भविष्यातील करिअरच्या संधी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. यतिन आर. सोंजे हे शयेनाक्ष इन्स्पेक्शन एलएलपी येथे ड्रोन NDT इन्स्पेक्शनचे डेसिग्नेटेड पार्टनर असून, KUB क्वालिटी सर्व्हिसेस प्रा. लि. येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तसेच, ते ड्रोन इन्स्पेक्शन आणि फ्लॉ आयडेंटिफिकेशन या क्षेत्रातील पेटंटधारक आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
मार्गदर्शन करताना सोंजे यांनी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (NDT) आणि नॉन-डिस्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन (NDE) या संकल्पना स्पष्ट केल्या. कोणत्याही घटकाचे किंवा साहित्याचे नुकसान न करता त्यामधील दोष शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध तंत्रज्ञानांची त्यांनी उदाहरणांसह माहिती दिली. यामध्ये पृष्ठभागावरील, पृष्ठभागाखालील तसेच अंतर्गत दोष शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनिट्रंट टेस्टिंग (PT), एडी करंट टेस्टिंग (ET), अल्ट्रासोनिक टेस्टिंग (UT), मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग (MT) आणि रेडिओग्राफिक टेस्टिंग (RT) या प्रमुख तपासणी पद्धतींचा समावेश होता. या तंत्रज्ञानांचा उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, औद्योगिक तपासणी आणि सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजांनुसार NDT विषयाशी संबंधित प्रकल्पांची निवड कशी करावी, सध्याच्या बाजारपेठेत कोणत्या प्रकारच्या प्रकल्पांना मागणी आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण प्रकल्प कसे विकसित करता येतील, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने NDT तपासणी करण्याच्या आधुनिक पद्धतींची माहिती देण्यात आली. तसेच, या क्षेत्रातील इंटर्नशिपच्या संधी, व्यावहारिक कौशल्यांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी उद्योगाभिमुख ज्ञान कसे विकसित करावे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना NDT क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि करिअरच्या संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला प्रा. ए. एस. कुलकर्णी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सत्राचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. ओ. एन. ठिगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत औद्योगिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्यात तांत्रिक कौशल्ये, संशोधनवृत्ती आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना आधुनिक औद्योगिक क्षेत्रातील संधींसाठी तयार करण्यासाठी महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

