सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
हुंडा मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात पती, सासू व दिराची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्र. ३) विनायक एम. रेडकर यांच्या न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (१) अन्वये हा आदेश दिला.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. २४२/२०१८ नुसार सौ. मेघाली यांनी पती सागर, सासू सुमन, दीर संतोष व सासरे सूर्यकांत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. व्यापारासाठी दोन लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून भा.दं.वि. कलम ४९८-अ सह ३४ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान आरोपी सासरे सूर्यकांत यांचे निधन झाल्याने त्यांच्याविरुद्धचा खटला निष्प्रभ झाला. उर्वरित आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू राहिली.
अंतिम युक्तिवादात बचाव पक्षाने अभियोग पक्षाच्या पुराव्यांचे विश्लेषण करून आरोप वाजवी संशयाच्या पलीकडे सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या मदनमोहन अबोट विरुद्ध पंजाब राज्य या न्यायनिर्णयाचा दाखलाही देण्यात आला.
तसेच कौटुंबिक न्यायालयातील हिंदू विवाह याचिका क्र. अ-४७७/२०२१ मधील निर्णयाचा आधार घेत पतीस घटस्फोट मंजूर झाल्याचा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला. कलम ४९८-अ अंतर्गत आवश्यक असलेली क्रूरता व छळ अभियोग पक्षाला वाजवी संशयाच्या पलीकडे सिद्ध करता आला नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी सागर, सुमन व संतोष यांची भा.दं.वि. कलम ४९८-अ सह ३४ मधून फौ.प्र.सं. कलम २४८(१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांचे जामीनरोखे व जातमुचलके रद्द करण्यात आले. तसेच अपीलाच्या औपचारिकतेसाठी फौ.प्र.सं. कलम ४३७-अ अंतर्गत प्रत्येकी २५ हजार रुपयांचे जातमुचलके दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
या प्रकरणात आरोपींतर्फे अॅड. श्रीनिवास कटकूर व अॅड. आकाश आयंची यांनी यशस्वीपणे काम पाहिले.

