सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यात सांगोला, मंगळवेढा, बार्शी, वैराग आणि सोलापूर शहरातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते शिक्षक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संस्थाचालकांशी संवाद साधणार आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
उदय सामंत यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी सांगोला येथून होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता कोळेगाव येथील मोटारसायकल रॅलीनंतर ते सांगोला येथे दाखल होतील. सकाळी १० वाजता माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता मंगळवेढा येथे शिक्षकांसोबत बैठक होणार असून, सकाळी १०.३० वाजता मंगळवेढा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकांमधून शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासह उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचाराबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
दुपारी बार्शी येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे संस्थेच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात उदय सामंत भेट देणार आहेत. त्यानंतर बार्शी येथील शिक्षक मेळावा आणि वैराग येथे आयोजित विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक व शिक्षकांच्या बैठका आणि चर्चासत्रांना ते उपस्थित राहतील. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसह शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे. विशेषतः शिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
सायंकाळी सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन ‘सेवालय’ येथे उदय सामंत यांची पदाधिकारी बैठक होणार आहे. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधणार असून, प्रमुख संस्थाचालकांशीही चर्चा करणार आहेत. यानंतर रात्री सचिन चव्हाण यांच्या कै. चंद्राम चव्हाण गुरुजी शैक्षणिक संकुलात आयोजित शिक्षक मेळाव्याला ते उपस्थित राहतील. तसेच होडगी महाराज मठ अक्कलकोट रोड येथे दर्शन व भेट घेऊन अक्कलकोट शहरातील टीनवाला मंगल कार्यालय या ठिकाणी शिक्षकांचा मेळावा पार पडणार आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचाराला चालना देण्याबरोबरच शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिली.

