माण प्रतिनिधी तेज न्यूज
भावकीचं राजकारण लय वंगाळ असतं गड्या! माणूस संपूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला किंवा राज्यालाही भारी पडू शकतो, पण भावकी म्हटलं की डोक्यात मुंग्या यायला सुरुवात होतेच. सध्या साताऱ्याच्या राजकारणात असाच एक विषय चांगलाच तापला आहे.
राज्याच्या राजकारणात भाजपचे फायरब्रँड नेते आणि विरोधी पक्षांसहित आपल्या सहकारी पक्षांच्याही नाकात दम आणणारे आमदार जयकुमार गोरे यांच्याच घरात आता राजकीय ठिणगी पडली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच 'डीसीसी' बँकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात आता जयकुमार गोरे यांना त्यांच्याच सख्ख्या भावाने, अर्थात मान-खटावमधील प्रस्थापित नेते शेखर गोरे यांनी थेट शड्डू ठोकून आव्हान दिले आहे. डीसीसी बँकेची ही कुस्ती जयकुमार गोरे यांना भलतीच जड जाऊ शकते, कारण शेखर गोरे यांचा जनसंपर्क आणि मान-खटाव मधील प्रभाव दांडगा आहे.
या राजकीय युद्धाला एक मोठी आणि रंजक पार्श्वभूमी आहे. काही काळापूर्वी जयकुमार गोरे यांच्यासाठी शेखर गोरे यांनी माघार घेतली होती, पण त्या माघारीची योग्य ती दखल न घेतली गेल्याने आता त्याचा वचपा काढण्याची संधी शेखर गोरे शोधत आहेत.
संपूर्ण राज्यभर भाजपचा झेंडा रोवत, साम-दाम-दंड-भेद वापरून पक्षाला अनुकूल गोष्टी घडवून आणणाऱ्या जयकुमार गोरे यांची सहकारातली वाट मात्र स्वतःच्याच भावामुळे बिकट झाली आहे. यंदा डीसीसीवर स्वतः संचालक होण्याच्या उद्देशाने जयकुमार गोरे यांनी पहिल्यापासूनच मोर्चेबांधणी आणि रणनीती आखली होती. सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी त्यांनी विशेष यंत्रणा राबवली आणि त्यात त्यांना सुरुवातीला यशही आले.
जयकुमार गोरे यांचा डीसीसीवरील प्रवेश निश्चित मानला जात असतानाच, कुठलाही गाजावाजा न करता शेखर गोरे यांनी ऐन मोक्याच्या क्षणी सोसायटी मतदारसंघातून आपला अर्ज दाखल करत संपूर्ण राजकीय समीकरणेच उलथवून टाकली.
या दोन्ही भावांमधला राजकीय संघर्ष आजचा नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकत्र सुरुवात केली होती, तेव्हा जयकुमार गोरे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर या दोघांत सातत्याने धुसफूस सुरू राहिली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी थेट जयकुमार गोरे यांच्या विरोधात दंड थोपटत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. जिल्हा बँकेच्या एका निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या विरोधात कैलासवासी सदाशिव पोळ तात्यांना शेखर गोरे यांनी मदत केली होती, तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेखर गोरे यांच्या विरोधात जाऊन जयकुमार गोरे यांनी सांगलीच्या कदम कुटुंबीयांना रसद पुरवली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दोघे एकमेकांविरुद्ध उभे होते. अगदी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही शेखर गोरे यांनी भावाविरुद्ध उभे राहण्याची घोषणा केली होती, परंतु त्यांच्या उपद्रवमूल्याची जाणीव असल्याने जयकुमार गोरे यांनी त्यांची समजूत काढली आणि माघार घ्यायला लावली.
त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांना विधानपरिषदेचा शब्द दिला होता. पण नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जुन्या व्हिडिओची आणि शब्दाची आठवण करून देऊनही, जयकुमार गोरे यांनी पुढे केलेल्या धैर्यशील कदम यांना तिकीट देण्यात आले. यामुळे दुखावलेल्या शेखर गोरे यांनी शिंदे गटाची (शिवसेनेची) वाट धरली आणि आता याच जुन्या वादाची ठिणगी डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पडली आहे.
गेल्या डीसीसी निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी न लढण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ यांच्यात चुरस होऊन चिठ्ठीच्या आधारे शेखर गोरे विजयी ठरले होते. यंदा मात्र एकाच मतदारसंघातून जयकुमार गोरे, शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ असे तिघेही रिंगणात आहेत. कोणीही अर्ज मागे न घेतल्याने ही लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे.
शेखर गोरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे 'मी काय करू शकतो' हे भावाला दाखवून देत स्वतःची किंमत सिद्ध करण्याची एक मोठी संधी आहे. तर दुसरीकडे, 'हात लावेल तिथं पाणी काढेल' अशी ओळख निर्माण झालेल्या जयकुमार गोरे यांच्यासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढाई आहे, कारण भावाकडून पराभूत झाल्यास त्यांच्या राजकीय प्रतिमेला मोठा डॅमेज होऊ शकतो. यात भर म्हणजे, राज्यात एकत्र सत्तेत असले तरी स्थानिक पातळीवर शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेसोबत जे काही राजकारण झाले, ते स्थानिक नेते विसरलेले नाहीत. त्यामुळे मनोजकुमार पोळ हे तुल्यबळ उमेदवार असूनही सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष गोरे बंधूंच्या या 'भावकीच्या लढाईकडे' लागले आहे.
तुमचं मत काय?
मित्रांनो, साताऱ्याच्या राजकारणातील हा 'भावकीचा आखाडा' कोण मारणार? जयकुमार गोरे आपली प्रतिष्ठा राखणार, शेखर गोरे आपला वचपा काढणार, की या दोघांच्या भांडणात मनोजकुमार पोळ बाजी मारणार? तुमचे सडेतोड मत नक्की मांडा!

