ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!
भीमानगर, प्रतिनिधी तेज न्यूज
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामातील उसाचा दर जाहीर न करताच साखर कारखान्यांकडून ऊसतोड सुरू करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखून धरली. तसेच भीमानगर येथे रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकून ऊस दर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चाच्या वाढत्या ओझ्याखाली दबला असताना दुसरीकडे कारखानदारांनी उसाचा दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकदा शेतातील ऊस कारखान्यात गेल्यानंतर कारखानदार ठरवतील तो दर स्वीकारण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
ऊस दर जाहीर करा, अन्यथा ऊसतोड करू देणार नाही!
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि उसाचा दर स्पष्ट न करता कारखाने सुरू करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे ऊसाचा योग्य दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड आणि ऊस वाहतूक सुरू करू देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. याच भूमिकेतून माढा-पंढरपूर तालुक्यांत ऊस वाहतूक करणारी वाहने रोखण्यात आली, तर भीमानगर येथे बारामती ॲग्रो कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, उत्पादन खर्चाची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या मैदानात उतरली आहे. कारखानदारांनी तातडीने ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या या आंदोलनातून देण्यात आला आहे.
“दर जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड नाही; शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळाल्याशिवाय माघार नाही!” हा निर्धार व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या लढ्याला सुरुवात केली आहे. आगामी काळात या आंदोलनाची धग संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पोहोचण्याची शक्यता आहे.

