सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा वाढदिवस ‘आरोग्य सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सांगोला शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे व शहराध्यक्ष सोमेश यावलकर यांनी दिली.
या आरोग्य सप्ताहात नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, हृदयविकार, मूत्रविकार, बायपास शस्त्रक्रिया, स्नायूंचे आजार, हाडांची ठिसूळपणा तपासणी तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर आवश्यक तपासणी व उपचारांच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
सांगोला शहरासह तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून गरजू नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आ. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आरोग्य सप्ताहाचा सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजय काळे यांनी केले आहे.

