नवदुर्गा - १
जिद्दीने अशक्याला शक्य करणारी -:आयेशा
संघर्षाच्या वाटेवरून सामाजिक नेतृत्वाकडे झालेला प्रेरणादायी प्रवास
काही माणसांच्या आयुष्यात संघर्ष हा अपघाताने येत नाही; तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार बनतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, वाट कितीही खडतर असो आणि पावलोपावली अडथळ्यांचे डोंगर उभे राहोत.जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाची साथ असेल तर माणूस नियतीची चौकटही ओलांडू शकतो. आयेशा हजरतअली सोनीकर यांचा जीवनप्रवास याच जिद्दीची, संघर्षाची आणि सामाजिक भानाची प्रेरणादायी कहाणी आहे.
प्रतापूर, ता. जत, जि. सांगली येथील रहिवासी असलेल्या आयेशा यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे गेले. बालपण संपण्याआधीच त्यांच्या आयुष्याला संघर्षाची किनार लाभली. त्या अवघ्या तीन दिवसांच्या असताना वडील सादिक पठाण यांनी मुलगी झाली म्हणून आईचा आणि त्यांचा त्याग केला. पुढे त्यांनी कधीही पत्नी किंवा मुलीकडे मागे वळून पाहिले नाही. अशा परिस्थितीत आजी, आजोबा, मामा, मामी आणि आईच्या आधाराने आयेशा वाढल्या.
लहानपणापासूनच त्यांना समाजातील मुलगा-मुलगी भेदभावाची झळ बसत होती. ‘मुलगी झाली’ म्हणून आईला सोडले गेले, घरातील रूढी-परंपरांनी मुलींना दुय्यम स्थान दिले आणि या अनुभवांनी त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला. समाजाने नकळत त्यांच्या मनात एक प्रश्न रुजवला,मुलगी म्हणून जन्माला येणे ही चूक आहे का? हाच प्रश्न पुढे त्यांच्या सामाजिक जाणिवेचा अंकुर ठरला.
आयेशा यांचे प्राथमिक शिक्षण कन्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण रामराव इंगवले हायस्कूलमध्ये झाले. त्यांना मदरशात इस्लामी धार्मिक शिक्षणासाठीही पाठवण्यात आले. मात्र, या शिक्षणामुळे त्यांना फारसे पुढील शिक्षण घेता आले नाही. माहेरी तबलीक समाजाची कडक बंधने होती. मुलींनी पडद्याआड राहावे, घराच्या चौकटीबाहेर पडू नये, अशा सामाजिक मानसिकतेचा त्यांना सामना करावा लागला.
परंतु जिथे मनाची कवाडे उघडी असतात, तिथे परिस्थितीची दारे फार काळ बंद राहू शकत नाहीत. आयेशा यांच्या मनातही परिवर्तनाची ठिणगी पडली होती.
वयाच्या लहानपणीच त्यांनी सामाजिक विषमता, भेदभाव आणि स्त्री-पुरुष असमानतेचे चटके अनुभवले. त्यामुळे समाजाकडे केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेतून पाहण्याऐवजी काहीतरी करण्याची ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. विवाहानंतरही त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. २६ नोव्हेंबर रोजी हजरतअली सोनीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. समतावादी विचारांचा जीवनसाथी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक प्रवासाला नवी उभारी मिळाली.
हळूहळू त्यांनी घराच्या उंबरठ्याबाहेर पाऊल टाकले. सुरुवातीला समाजकार्य करण्यासाठी घराबाहेर पडतानाही त्यांना बराच वेळ लागला. मात्र, एकदा पाऊल पडले आणि वाट सापडली की त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
त्यांना संविधान, कायदा, हक्क आणि समानतेचे महत्त्व समजावून सांगणारा जीवनसाथी लाभला. त्यानंतर आयेशाच्या आयुष्यात एक वर्षाचा आझाद आल्याने तर हर्षोल्लास बहर आला आहे.
“कायदा, हक्क, अधिकार आणि समानता ही केवळ पुस्तकातील शब्द नसून जगण्याची साधने आहेत,” ही जाणीव त्यांच्या मनात दृढ होत गेली. बालपणी मिळालेले भेदभावाचे संस्कार त्यांच्या पायातील बेडी न ठरता पुढे परिवर्तनाची ताकद बनले.प्रतापूर गावातील बचत गटाच्या माध्यमातून त्यांना मिटींगसाठी बाहेर पडण्याची संधी मिळाली. महिलांमध्ये काम करताना त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. पुढे क्रांती लोकसंचालित साधन केंद्राशी त्यांचा संबंध आला. त्यानंतर प्रतापूर ग्रामपंचायतीवर विषय समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रश्न समजून घेण्याची आणि ते सोडविण्यासाठी प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली.
याच काळात त्यांना ऑनलाइन मीटिंग, प्रशिक्षण आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नवे विश्व खुले झाले. ग्रामीण विकास संस्थेच्या प्रशिक्षणातून त्यांना विविध सामाजिक प्रश्नांची ओळख झाली. ‘विशेष म्हणजे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींच्या सहवासातून त्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक व्यापक झाल्या. समोरच्यांचे दुःख, वेदना आणि समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनली.
ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कोरो इंडिया या संस्थेच्या फेलोशिपमध्ये सहभाग घेतला. जल व्यवस्थापनासारख्या विषयावर काम करताना त्यांचा लोकसंपर्क वाढला. समाजकार्य करताना अनुभव हेच त्यांचे विद्यापीठ आणि समाजच त्यांची पाठ्यपुस्तके बनले.
संविधानातील मूल्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्या विचारांना आणखी व्यापक दिशा मिळाली. पुरोगामी विचारांशी त्यांची नाळ जुळली. विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संविधान साक्षर करण्याचे काम त्यांनी सुरू केले. “घराच्या कोठडीतून बाहेर पडलेल्या स्त्रीने केवळ स्वतःची वाट चालू नये, तर इतर महिलांसाठीही वाट निर्माण करावी,” या भावनेतून त्यांनी महिला सक्षमीकरणाचे काम हाती घेतले.
याच काळात त्यांची ओळख अग्रणी सोशल फौंडेशनचे मुनीर शिकलगार यांच्याशी झाली. त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत आयेशा अग्रणीच्या कार्याशी जोडल्या गेल्या. मुस्लिम सत्यशोधक मंडळाशीही त्यांचा संबंध आला. अग्रणी सोशल फौंडेशनमध्ये संघटिका म्हणून त्या कार्यरत आहेत. डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या एका प्रकल्पात जिल्हा समन्वयकपदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. Child Rights – Access to Justice या प्रकल्पात काम करताना बालहक्क आणि न्यायव्यवस्थेच्या प्रश्नांशी त्यांचा जवळून संबंध आला.
या प्रवासात संत तुकाराम महाराजांचा विद्रोही विचार, महात्मा फुले-शाहू-आंबेडकरांची समतेची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण व सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान त्यांना प्रेरणा देत राहिले. शिक्षणासाठी नोबेल पुरस्कार मिळविणारे युसुफसाई यांचे आत्मचरित्रही त्यांना प्रेरणादायी वाटते. ‘सत्यशोधक’ आणि ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’ यांसारख्या चित्रपटांविषयीही त्यांना विशेष आस्था आहे. सलमान खान आणि क्रिती सेनन यांचा अभिनय त्यांना आवडतो.
समाजप्रबोधनाचे कार्य हा त्यांच्या आयुष्याचा छंदच बनला आहे. त्यातून त्यांना मानसिक समाधान मिळते. सामाजिक कार्यामुळे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ सापडला आहे. कालपर्यंत समाजाच्या रूढ चौकटीत अडकवून ठेवलेली एक मुलगी आज समाजाच्या प्रश्नांवर निर्भीडपणे बोलते, महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेते आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करते, हीच त्यांच्या प्रवासाची खरी कमाई आहे.
त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा “थेंबे थेंबे तळे साचे"या म्हणीचा प्रत्यय देणारा आहे. छोट्या-छोट्या संधींचा उपयोग करून त्यांनी आत्मविश्वासाची शिदोरी जमा केली. “कष्टाला पर्याय नाही” हे त्यांनी केवळ ऐकले नाही, तर जगून दाखवले. ज्या परिस्थितीने त्यांना कधी चार भिंतींच्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच परिस्थितीला त्यांनी आपल्या जिद्दीने छेद दिला.
आज देशातील भावी पिढी घडविणे आणि युवा नेतृत्व निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. राष्ट्रसेवा दलाशी जोडून त्या या दिशेने काम करीत आहेत. एका लहानशा कुटुंबात मुलगी म्हणून जन्माला आलेली आयेशा, सामाजिक बंधने झुगारून, संघर्षाच्या वाटेने चालत आज ‘बेस्ट वुमन’ म्हणून सन्मान मिळविण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे.
“जिथे इच्छा तिथे मार्ग” ही म्हण त्यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडते. तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता; पण त्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर, “अशक्य गोष्टी साध्य करण्याची जिद्द असेल, तर माणूस काहीही करू शकतो.”
लेखक - सचिन सरतापे म्हसवड
आयेशा सोनीकर यांची कथा ही केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही; ती एका मुलीने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केलेल्या संघर्षाची, सामाजिक रूढींना दिलेल्या आव्हानाची आणि संविधानिक मूल्यांच्या दिशेने उचललेल्या ठाम पावलांची कहाणी आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास सांगतो.परिस्थिती माणसाला घडवत नाही; परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला घडवते.
आणि ही जिद्द अजून थांबलेली नाही. समतेची वाट, संविधानाचा विचार आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ,या प्रवासात आयेशा सोनीकर यांची पावले यापुढेही अविरतपणे पुढेच पडत राहणार आहेत.

