नाशिक जिल्हा प्रतिनिधी नवनाथ पाटिल गायकर तेज न्यूज
कवितेला व्यासपीठ, नवोदितांना संधी आणि साहित्यप्रेमींना सातत्याने सृजनशील उपक्रमांची पर्वणी देणाऱ्या ‘नाशिक कवी’ या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, प्रकाशक व संपादक सुभाष सबनीस, तर कोषाध्यक्षपदी इंजि. अजिंक्य मगर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर निवड करण्यासाठी नाशिक कवीच्या कार्यकारिणीची बैठक झाली.
या बैठकीत सबनीस आणि मगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अशी माहिती संस्थेचे कार्यवाह कवी नंदकिशोर ठोंबरे यांनी दिली.
नाशिकच्या साहित्यविश्वात ‘नाशिक कवी’ ही संस्था म्हणजे कवितेची अखंड वाहती सरिता मानली जाते. ज्येष्ठ कवी शरद पुराणिक यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या पहिल्या दिवसापासून सुभाष सबनीस संस्थेशी जोडले गेले आहेत. कार्यवाह, कार्याध्यक्ष आणि आता अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांचा ‘नाशिक कवी’सोबतचा प्रवास गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अविरत सुरू आहे.
सुभाष सबनीस यांच्या साहित्यिक कारकिर्दीचीही मोठी व्याप्ती आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह अशा विविध साहित्यप्रकारांतील त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
गेल्या सोळा वर्षांपासून ते ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाचे संपादक व प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, प्रकाशन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या माध्यमातूनही त्यांचे कार्य सुरू आहे.
कै. बाळासाहेब मगर यांचे चिरंजीव इंजि.अजिंक्य मगर वडिलांप्रमाणेच काव्य आणि साहित्याची आवड असलेले रसिक आहेत. ते स्वतःही लेखन करू लागले असून, नाशिक कवीच्या पुढील वाटचालीत त्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी गझलकार बाळासाहेब गिरी, तर कार्यवाहपदी कवी नंदकिशोर ठोंबरे हे कायम आहेत.
कार्यकारिणीमध्ये स्मिता बनकर, अलका कुलकर्णी, अजय बिरारी, किरण मेतकर, भारती देव, राजेश जाधव, प्रांजली आफळे आणि सुरेश चौरे यांचा समावेश आहे.
साहित्यासाठीच सारे काही - सबनीस यांची ग्वाही.
‘नाशिक कवी या संस्थेमुळे साहित्यविश्वात एक वेगळी ओळख मिळाली आहे. दोन तपांचा काळ ‘कवितेसाठी सारे काही’ या भावनेने काम करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदामुळे माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे. सर्व कार्यकारिणी सदस्य आणि नाशिककरांच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला नवे परिमाण देण्याचा निश्चित प्रयत्न करू,’ असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष सबनीस यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष सबनीस यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक यांचे वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.
परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर, माणिकराव गोडसे, रविद्रं पाटिल, विदया पाटिल, राजु आतकरी, श्रीराम तोकडे, रमेश मुकणे आदिसह अनेकानीं अभिनंदन केले आहे.

