पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड.संध्या देशपांडे , वसुधा फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांच्या नावे नुकतेच होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमधे प्रत्येकी दोन विश्वविक्रम नोंदवले गेले.
या विश्वविक्रमी यशाबद्दल होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे संस्थापक, संपादक आणि तब्बल 309 विश्वविक्रम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे साहित्यिक, कलावंत , विचारवंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते वसुधा नाईक, मधुकर्णिका सासवडे आणि ॲड.संध्या देशपांडे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
कुठलाही विश्वविक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ति,सर्वोच्च ध्येय , निर्णयतत्परता,मनाची एकाग्रता,कार्यतत्परता,आत्मविश्वास आणि प्रतिकुलतेवर मात करण्याची क्षमता असावी लागते असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या मुख्य भाषणात केले. सुनंदा कुलकर्णी आणि पद्मा वेदपाठक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार केला.
याप्रसंगी मधुकर्णिका सासवडे आणि ॲड.संध्या देशपांडे यांचीही भाषणे झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि मधुरंग संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई यांनी विश्वविक्रम करणा-या सदर कर्तबगार महिलांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. कायमच स्त्रीशक्तिचा आदर करणा-या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचे योगदान गौरवास्पद आहे असे मंदाताई नाईक यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन केले.
मधुकर्णिका सासवडे यांनी 110 प्रकारच्या मधाचा संग्रह केला आहे. गेली 20 वर्ष मधमाशी वाचवा:विश्व वाचवा अभियान राबवतात.40,000 हून अधिक वंचित,दिव्यांग बालांकडून त्यांनी प्रबोधनपर गाणी म्हणवून घेतली आहेत.
वसुधा नाईक ह्या गेल्या 15 वर्षांपासून दिव्यांग आणि वृध्दाश्रमातील वृध्दांसाठी सातत्याने योगदान देत आहेत तसेच दरवर्षी 5 अनाथ बालांना दत्तक घेत असतात.
ॲड.संध्या देशपांडे गेली 40 वर्ष गरजू नागरिकांना मोफत कायदा सल्ला देत आहेत.तसेच 2012पासून कॅन्सर रुग्णांना सातत्याने समुपदेशन करण्यासाठी योगदान देतात.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचा उपक्रम विनामूल्य आणि निरपेक्षपणे करत असल्याबद्दल श्रीनिवास तेलंग यांनी डाॅ.घाणेकर यांचा विशेष गौरव केला आहे.कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी या अनियतकालिकाच्या 1192 व्या विशेषांकाचे प्रकाशन सुनंदा कुलकर्णी,पद्मा वेदपाठक ,श्रीनिवास तेलंग आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम सांजभेट आणि होरायझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस तर्फे करण्यात आला.

.jpg)