स्वामी दर्शन व्यवस्थेत चेअरमन महेश इंगळे यांनी दिला भाविकांना भावनेचा आधार - अभिनेते देवदत्त नागे
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात भाविकांच्या भावनांचा आदर करीत सुलभ स्वामी दर्शन प्रणाली आमलात आणली आहे. प्रभावी नेतृत्व संयमी व्यक्तीमत्व या संस्कारीक गुणांसह मंदीरातील स्वामी दर्शन व्यवस्थेत चेअरमन महेश इंगळे यांनी भाविकांना भावनेचा आधार दिला असल्याचे मनोगत छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध मराठी अभिनेते तथा जय मल्हार या गाजलेल्या मालिकेत खंडोबाचे पात्र साकारणारे लोकप्रिय अभिनेते देवदत्त नागे यांनी व्यक्त केले.
नुकतेच अभिनेते देवदत्त नागे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी अभिनेते देवदत्त नागे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी अभिनेते देवदत्त नागे बोलत होते.
पुढे बोलताना अभिनेते देवदत्त नागे म्हणाले की आज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतल्याने स्वामींचे आशीर्वाद लाभले आहेत. खंडोबाची मी साकारलेली भूमिका ही दैवताचीच होती आणि आज प्रत्यक्ष दैवताच्या दरबारी आलो आहे. अक्कलकोटला आलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते. मी अनेक ठिकाणी जातो पण इथे असलेली शांतता आणि स्वामींचा आशीर्वाद काही वेगळाच आहे. अध्यक्ष महेश मालक इंगळे आणि प्रथमेश इंगळे यांच्या माध्यमातून देवस्थानचा जो कायापालट होत आहे, भाविकांसाठी जी उत्तम व्यवस्था केली जात आहे ते पाहून खूप समाधान वाटले.
स्वामींच्या सेवेतच खरा आनंद आहे असेही मनोगत व्यक्त करून पुढील सेवेसाठी प्रथमेश इंगळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव, सागर गोंडाळ आदीसह सेवेकरी व भाविक उपस्थित होते.

