सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) वतीने २८, २९ आणि ३० सप्टेंबर २०२६ रोजी देशव्यापी तीन दिवसांचा बँक संप पुकारण्यात आला आहे. बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही प्रमुख मागणी असून इतर प्रलंबित प्रश्नांसाठीही कर्मचारी संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याबाबत यापूर्वी झालेल्या कराराची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा दावा Ufi कडून करण्यात आला आहे. या मागणीवरून युनियन आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) तसेच संबंधित यंत्रणांमध्ये चर्चा झाली; मात्र ठोस तोडगा न निघाल्याने २८ ते ३० सप्टेंबरचा संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सलग पाच दिवस शाखा सेवांवर परिणाम
२६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संप झाल्यास बँकांच्या शाखांमधील प्रत्यक्ष कामकाज सलग पाच दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे.
कोणत्या सेवा प्रभावित होणार ?
संपामुळे बँक शाखांमधील रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, धनादेशाशी संबंधित कामे आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने होणारे प्रत्यक्ष व्यवहार प्रभावित होऊ शकतात.
मात्र एटीएम, यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहण्याची अपेक्षा आहे. संपाच्या काळात काही शाखांमधील सेवा कर्मचारी सहभागानुसार प्रभावित होऊ शकतात.
ग्राहकांनी आधीच नियोजन करण्याचे आवाहन.
एसबीआयसह विविध बँकांनी ग्राहकांना संपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे शाखा व्यवहार आधीच पूर्ण करून घेण्याचा सल्ला दिला आहे. रोख रक्कम, धनादेश किंवा प्रत्यक्ष शाखेत जाऊन करावयाची कामे असल्यास ग्राहकांनी त्याचे नियोजन आगाऊ करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

