पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर, पंढरपूर यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व निर्माल्य संकलनाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
संस्थापिका सौ.सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक संतोष कवडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात नदी, जलस्रोत व परिसराचे प्रदूषण होऊ नये, तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमात शाळेतील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन तसेच निर्माल्य संकलनाचे कार्य केले. नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले.
स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांना महेश भोसले व . अशपाक मुजावर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून “पर्यावरणाचे रक्षण हीच खरी गणेशभक्ती” असा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी व स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली. शाळेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

