मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
घाटकोपर (पश्चिम) येथील भटवाडी परिसरातील सरस्वती विद्यामंदिर शाळेचे क्रीडा शिक्षक संदिप बाबुराव येवले यांना सन २०२६-२७ चा मानाचा *‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार’* प्रदान करण्यात आला आहे.
हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड, सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव मा. संजय शेटे,पाचवे हिंदकेसरी दिनानाथ सिंह (आण्णा), शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी),धनंजय पाटील, विनोद शिंदे,अमोल साठे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते येवले यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
*३० वर्षांची तायक्वॉन्दो सेवा*
संदिप येवले हे गेली ३० वर्षे तायक्वॉन्दो या क्रीडा प्रकारात एक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो खेळाडूंना मार्गदर्शन केले असून त्यांचे अनेक विद्यार्थी राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून पदके पटकावत आहेत. महाविद्यालयीन आणि ऑल इंडिया विद्यापीठ स्पर्धेतही त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी यश संपादन केले आहे.
*यापूर्वीचे पुरस्कार*
संदिप येवले यांना यापूर्वी २००८ मध्ये मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, २०१७ मध्ये कोरिया देशाचा प्रतिष्ठित ‘कुक्किवॉन अवॉर्ड’ आणि २०१९ मध्ये ‘पै. खाशाबा जाधव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.२०२६ मध्ये आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील तायक्वॉन्दो प्रशिक्षक,खेळाडू,शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

