पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात पत्रकार प्रशांत माळवदे यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल शाल, फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाहक धनाजी चव्हाण, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी तसेच कारंडे इंटरनॅशनल स्कूलचे निमंत्रक श्रीधर कारंडे यांच्या हस्ते प्रशांत माळवदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारिता ही समाजातील विविध घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम असून, पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे जेष्ठ पत्रकार अभय दिवाणजी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सांगोला परिसरातील पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

