नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते नाशिक फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडले.
या उपक्रमात सायबर सिक्युरिटी अवेअरनेस, गरजू महिलांना नऊवारी साडी वाटप आणि हास्य योगाचे प्रात्यक्षिक अशा विविध उपक्रमांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
सायबर सुरक्षा जनजागृती
“सावध रहा, सुरक्षित रहा!” या संदेशातून गावातील नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर तज्ञ निलेश कदम यांनी सायबर क्राईमचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, संशयास्पद लिंक व फोन कॉलपासून सावध राहण्याचे महत्त्व तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. विशेषतः महिलांनी या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत “सायबर सुरक्षा म्हणजेच डिजिटल सुरक्षितता” हा संदेश आत्मसात केला.
गरजू महिलांना नऊवारी साडी वाटप
“मदतीचा हात, सन्मानाची साथ!” या भावनेतून समाजातील गरजू व विधवा महिलांना नऊवारी साड्यांचे वाटप करण्यात आले. लखू शेठ पारख व सौ. प्रमिला पारख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
हास्य योगातून आनंदाचा संदेश
“स्वतः हसा, दुसऱ्यांनाही हसवा!” या संदेशासह फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी गावातील महिलांसोबत हास्य योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
हास्य योगामुळे तणाव कमी होण्यास, सकारात्मक विचार वाढण्यास आणि दैनंदिन जीवनात आनंद निर्माण होण्यास मदत होते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. हास्य योगाच्या प्रात्यक्षिकामुळे महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले निखळ हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “आम्हीही आपल्या गावात हास्य क्लब सुरू करू!” असा संकल्प केला.
“हास्य हेच आरोग्याचे गमक… आणि आनंद हीच जीवनाची खरी संपत्ती!” या उपक्रमाला तरुणाई तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तळेगाव ग्रामस्थांनी नमस्ते नाशिक फाऊंडेशन तसेच अध्यक्षा स्नेहल देव यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, आरोग्यविषयक व जनजागृतीपर उपक्रम गावात आयोजित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक हेमंत पारख, सरपंच गणेश पगार, माजी उपसरपंच कृष्णा दाते, रवींद्र काशिनाथ निंबेकर, बाळासाहेब आहेर, रामदास पगार, सामाजिक कार्यकर्ते विजय दाते, तानाजी पगार, निलेश पगार, अनिता भंडारकर, साधना कुनगर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमस्ते नाशिक फाऊंडेशनचा सामाजिक संदेश — “जिथे कमी तिथे आम्ही… समाजाच्या सुख-दुःखात सदैव आपल्या सोबत!”

