पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
'शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी (कॅप राऊंड-४) सोमवार, दि. ०३ ऑगस्ट २०२६ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.०४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. क्रमांक ६४३७) मध्ये कॅप राउंड साठी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दि.०६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.' अशी माहीती स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.
सन २०२६-२७ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज निश्चित करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता सोमवार, दि. ०३ ऑगस्ट २०२६ पासून चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे सुरु होणार असून ती प्रक्रिया मंगळवार, दि.०४ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी नीट अभ्यास करून कॅप राऊंड- ४ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. कॅप राउंडच्या या दोन दिवसात घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सर्व बाजूंनी विचार करून योग्य महाविद्यालयाची निवड करावी. तीन वर्षे मौज मजा करण्यापेक्षा तीन वर्षे परिश्रम करून घेणाऱ्या महाविद्यालयाची निवड करावी, जेणेकरून भविष्यकाळ सुखाचा व समृद्धीचा जाईल.
डिप्लोमा प्रथम वर्षासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या व तृतीय फेरीत बेटरमेंट केलेल्या तसेच तृतीय फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कुठलीही सीट मिळालेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना या चौथ्या कॅप राऊंडचा लाभ घेता येणार आहे. चौथ्या फेरीसाठी जागा वाटप गुरुवार, दि.०६ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळावरून प्रदर्शित केले जाईल. चौथ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती व प्रवेश निश्चिती शुक्रवार दि. ०७ ऑगस्ट २०२६ ते शनिवार दि. ०८ ऑगस्ट २०२६ या दरम्यान करता येईल.
प्रथम वर्ष डिप्लोमा च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस. गायकवाड (मो. ९८९०५६६२८१) व प्रा. जे.बी. रोडगे (मो. ९७६७८५६०२९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदविका अभियांत्रिकीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर व कॅम्पस प्लेसमेंटच्या विक्रमी निवडीवर स्वेरीमध्ये अभूतपूर्व गर्दी होण्याची चिन्हे आहेत.

