पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
जुलैच्या महिन्याच्या शेवटाला मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. अनेक भागात नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. तर बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून, त्यानंतर (15 ऑगस्टनंतर) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. तर 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन त्या अनुषंगाने पावलं उचलणे गरजेचे आहे.
◼️ देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता
नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. 15 ऑगस्टनंतर मात्र राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर 'मध्यम एल निनो' परिस्थिती असून, मान्सूनच्या उर्वरित काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.
◼️ तळकोकणात समाधानकारक पाऊस; भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात
तळकोकणात भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. गेले काही दिवस समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग दिला असून अंतिम टप्प्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 हजार हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड केली जाते, सध्य स्थितीत जिल्ह्यात 48 हजार हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीची लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत सरासरी 74 टक्के पाऊस झाला असून शेतीसाठी झालेला पाऊस पूरक आहे.
◼️ सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट
तळकोकणात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने तिलारी धरण ८३.८२ टक्के भरलं असून धरणातून ७३९४ क्युसेक वेगाने तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणातून ७३९४ क्युसेक वेगाने तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर १४ लहान मोठी धरण भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७८.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
◼️ लातूर जिल्ह्याला तीन दिवसांच्या पावसाने खरीपाला दिलासा; मात्र प्रकल्प अद्याप तहानलेलेच
गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा आदी तालुक्यांमध्ये पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून पेरणी झालेल्या पिकांची वाढही जोमाने होत आहे.
मात्र, हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरला असला तरी जलसाठ्याच्या दृष्टीने अद्याप समाधानकारक ठरलेला नाही. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्प आणि १३५ लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १३.६९ टक्के पाणीसाठा असून, मागील दोन दिवसांच्या पावसामुळे प्रकल्पांच्या साठ्यात विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे धरणे आणि प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून, आगामी काळात दमदार पावसाची गरज कायम आहे.

