पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दि. ४ व ५ जुलै रोजी विधीपूर्वक संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सदरची सर्व कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत. श्री व्यंकटेश मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील या मंदिराच्या बाहेरील भिंतींना तडे गेले होते तसेच भिंती बाहेरच्या दिशेने फुगल्या होत्या. त्यामुळे जीर्णोद्धारामध्ये मंदिराची संपूर्ण मोजमापासह नोंद करण्यात आली. प्रत्येक दगडाला क्रमांक देऊन त्याची स्वतंत्र नोंद घेण्यात आली. त्यानंतर स्वाईल बॅग सपोर्ट या तंत्राच्या सहाय्याने दगड काळजीपूर्वक उतरविण्यात आले. चुन्याच्या काँक्रीटचा व दगडांचा मजबूत पाया घालून मूळ दगडांचा वापर करत मंदिराची पूर्ववत पुनर्बांधणी करण्यात आली. पूर्णतः खराब झालेल्या दगडांच्या जागी त्याच शैलीतील नवीन दगड बसविण्यात आले. विटा व चुन्याच्या दाट पेस्टमध्ये नवीन शिखर उभारून त्यास पर्यावरणपूरक रंग देण्यात आले असून पाणी झिरपू नये म्हणून संरक्षक थर देण्यात आला आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर या मंदिराच्या मूळ दगडी वास्तूवर आतून टाईल्सचे आवरण व बाहेरील बाजूस रंग देण्यात आल्यामुळे बेसॉल्ट दगडाची नैसर्गिक श्वसनक्षमता (Breathability) कमी झाली होती. त्यामुळे जीर्णोद्धारामध्ये टाईल्स काढून ,एअर ॲब्रेशन तंत्राद्वारे दगडावरील रंग स्वच्छ करण्यात आला. जुनी फरशी काढून नवीन दगडी फरशी बसविण्यात आली. दगडांच्या सांध्यांमध्ये लाईम पॉईटींग करण्यात आले. लाकडी भागांची दुरुस्ती व पॉलिश करण्यात आले. शिखरावरील सिमेंट प्लास्टर काढून त्याजागी चुन्याचा वापर करून पारंपरिक पद्धतीने काम पूर्ण करण्यात आले व पर्यावरणपूरक रंग देण्यात आला आहे.
बाजीराव पडसाळ या परिसरातील तात्पुरते पत्र्याचे छत काढून नैसर्गिक हवा व प्रकाशाचा पुरेपूर वापर होईल तसेच भाविकांना विश्रांतीसाठी आच्छादित जागा उपलब्ध होईल, अशा प्रकारे कायमस्वरूपी हेरिटेज स्वरूपाचे शेड उभारण्यात आले आहे. यासोबत एअर अम्ब्रेशन, लाईम पॉईटींग नवीन दगडी फ्लोअरिंग तसेच संरक्षक कोटिंगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
कचेरीजवळील श्री मारुती मंदिरालाही जवळील झाडाच्या मुळांमुळे भिंतींना तडे गेले होते व त्या बाहेरच्या बाजूस फुगल्या होत्या. या मंदिराची काळ्या बेसॉल्ट दगडाचा व चुन्याच्या मोर्टारचा वापर करून पुनर्बांधणी करण्यात आली. विटा व चुन्याच्या मोर्टारमधील नवीन शिखर उभारून त्यास पर्यावरणपूरक रंग देण्यात आला. तसेच पावसाचे पाणी झिरपू नये म्हणून संरक्षक दगडी थर देण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या या संवर्धन कामांमुळे मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जपत त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ४ व ५ जुलै रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत पार पाडण्यात येत आहे. त्यानंतर सदरची सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली राहतील असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.


