सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगेश चिवटे यांच्या आमदारकीच्या आणि आगामी शिक्षक निवडणूक उमेदवारीच्या विषयावर मोठे भाष्य केले आहे. "मंगेश चिवटे यांना आमदारकी देण्याचा निर्णय आणि त्याचा पूर्ण अधिकार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे," असे सामंत यांनी स्पष्ट केले. सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्योगमंत्री उदय सामंत हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री आणि चिवटेंच्या समन्वयामुळे 'सैराट' फेम अरबाजला मदत
पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. "मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि मंगेश चिवटे यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे 'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेख याला मोलाची मदत मिळाली," अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
शिक्षक निवडणुकीतील उमेदवारीवर सामंत यांचे वक्तव्य
याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आगामी शिक्षक निवडणुकीत पूर्वाश्रमीचे पत्रकार मंगेश चिवटे यांना शिवसेना उमेदवारी देणार का? असा थेट प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, "शिंदे साहेब जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा ते खूप मोठे आणि व्यापक निर्णय घेतात. याची प्रचिती त्यांनी आजवर घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांवरून संपूर्ण महाराष्ट्राला आली आहे. त्यामुळे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार केवळ एकनाथजी शिंदे साहेबांनाच आहेत."
सामंत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारीबाबत आणि मंगेश चिवटे यांच्या राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

