सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. ६) श्रीमती जे. पी. पाटील यांनी दिनांक १३ जुलै २०२६ रोजी एका महत्त्वपूर्ण निकालान्वये, आरोपी सत्यम महेंद्रकुमार शेट (पती )व महेंद्रकुमार शेट ( सासरे), ज्योतीबेन ( सासु), हिरेन ( दिर), मोनलबेन (भावजय)यांच्यासह एकूण ५ सदस्यांची हुंडाबळी, शारीरिक व मानसिक छळ आणि दमदाटीच्या खोट्या आरोपातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे.
बचाव पक्षाचे विद्वान विधिज्ञ ॲड. श्रीनिवास कटकूर यांनी मांडलेला भक्कम युक्तिवाद आणि पुराव्यांमधील त्रुटी न्यायालयासमोर आणल्यामुळे आरोपींवरील सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले.
खटल्याची पार्श्वभूमी व विधीज्ञांचा युक्तिवाद:
फिर्यादी सोनाली सत्यकुमार शेट यांनी पती सत्यम शेट आणि सासरच्या इतर नातेवाईकांविरोधात सोलापूर येथील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर छळ आणि पैशांची मागणी केल्याचे आरोप लादण्यात आले होते.
या खटल्यात आरोपींतर्फे काम पाहताना ॲड. श्रीनिवास कटकूर यांनी न्यायालयात बाजू मांडली की, अभियोग पक्षाकडे (पोलीस व फिर्यादी) आरोपींविरुद्ध कोणताही सबळ आणि कायदेशीर पुरावा उपलब्ध नाही. फिर्यादीने केवळ तक्रारीवर सही असल्याचे मान्य केले, मात्र तक्रारीतील मजकुराबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती.
न्यायालयाचा मुख्य निकाल:
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे स्पष्ट केले की, अभियोग पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा वाजवी शंकेच्या पलीकडे शाबीत करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) (नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम २७१ (१)) अन्वये न्यायालयाने खालील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली:
१. सत्यम महेंद्रकुमार शेट (पती)
२. महेंद्रकुमार अमृतलाल शेट (सासरे)
३. ज्योतीबेन महेंद्रकुमार शेट (सासू)
४. हिरेन महेंद्रकुमार शेट (दीर)
५. मोनलबेन हिरेश शेट (जाऊ)
(सर्व रा. वर्धमान कॉलनी, वाढवण, जि. सुरेंद्र नगर, गुजरात)"न्यायालयाने दिलेला हा निकाल कायद्याच्या आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. खोट्या आरोपांमुळे निष्पाप लोकांना होणारा त्रास या निकालामुळे दूर झाला असून शेट कुटुंबाला पूर्ण न्याय मिळाला आहे.ॲड. श्रीनिवास कटकूर (बचाव पक्षाचे विधीज्ञ, सोलापूर)

