सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
धावपळीच्या आजच्या युगात माणूस माणसापासून दूर जात असताना, समाजात प्रेम, जिव्हाळा, बंधुभाव आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच प्रत्येक सामान्य व्यक्तीचा वाढदिवस सन्मानाने साजरा व्हावा या उदात्त भावनेतून सोलापुरात १ जून रोजी एका अनोख्या सामूहिक वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभूतपूर्व सोहळ्यात तब्बल २७५ कुटुंबांतील ५०० जणांचा सामूहिक वाढदिवस अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सोलापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या सेवाभावी नेतृत्वातून प्रेरणा घेत, माजी सहाय्यक आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाशभाऊ राठोड यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाणक्य गुरुकुल व बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या सोहळ्यात वाढदिवस सेलिब्रेशनसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सेवानिवृत्त मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
वाढदिवस म्हणजे प्रेमाचा आनंदोत्सव: खा. ज्योतीताई वाघमारे
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सोलापूरच्या कन्या व नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी आयोजकांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या,
"वाढदिवस हा फक्त केक कापण्याचा क्षण नसून आपल्या माणसांच्या प्रेमात आणि सन्मानात जगण्याचा आनंदोत्सव आहे. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून जनसामान्यांच्या सुख-दुःखात कायम पाठीशी उभी राहणारी ताकद आहे, हेच या कार्यक्रमातून सिद्ध होते."
संयोजक प्रकाश राठोड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच आगामी काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबवून युवा जागृती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
विजापूर रोडवरील सोरेगाव ते कुमठे रोड दरम्यान असलेल्या 'श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट' येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हा सोहळा पार पडला. १ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या सर्व नागरिकांचा आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल आणि पवित्र रोप भेट देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत सामूहिक केक कापला. उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक ब्रीजमोहन फोपलिया, नगरसेवक प्रियदर्शन साठे, शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी नगरसेविका शैलजाताई राठोड, शिक्षक नेते वीरभद्र यादवाड, एमएसइबीचे निवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, वेदमूर्ती बसवराज स्वामी तीर्थ यांच्यासह पत्रकार, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले, तर प्रास्ताविक व स्वागत ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोहळ्याचे समन्वयक काशिनाथ भतगुणकी यांनी केले. उपस्थितांचे आभार युसुफ पिरजादे यांनी मानले. या कार्यक्रमाला वाढदिवस धारकांचे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांनी अलोट गर्दी केली होती.


