स्वामी भक्तीच्या प्रबोधनातून भक्त लोक स्वावलंबी बनत आहेत - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
सहकारमंत्री (कॅबीनेट दर्जा) बाबासाहेब पाटील यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केले मनोगत.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
स्वामींनी 'एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा विचार आपल्या कृतीतून दाखवलं आहे. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हा स्वामींचा अभयमंत्र स्वामी भक्तांच आत्मा आहे. श्री स्वामी समर्थ यांनी वेळोवेळी केलेले भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधन हे भाविकांसाठी कल्याणकारी आहेत,त्यामुळे स्वामी भक्तीच्या प्रबोधनातून भक्त लोक स्वावलंबी बनत आहेत. असे मनोगत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
सहकार मंत्री महाराष्ट्र बाबासाहेब पाटील यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी सहकारमंत्री पाटील बोलत होते.
पुढे बोलताना सहकारमंत्री पाटील यांनी स्वामी आजही दुःखी-पीडितांना आधार देत आहेत. स्वामींनी 'एकमेकांना साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा विचार कृतीतून दाखवला. आपल्या सहकार खात्याचे धोरणही तेच आहे. शेतकरी, बचतगट, संस्था यांनी एकत्र येऊन स्वावलंबी व्हावे. स्वामी समर्थांनी केवळ चमत्कार केले नाहीत, तर लोकांना स्वावलंबी बनवले. सहकारातूनही नशिबवादी न होता प्रयत्नवादी व्हा हाच स्वामींचा खरा संदेश असल्याचे मनोगतही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले व आज येथे झालेल्या सन्माना प्रित्यर्थ मंदीर समितीचे व चेअरमन महेश इंगळे यांचे विशेष आभार मानले.
यावेळी युवा नेते प्रथमेश इंगळे, अक्कलकोटचे सहायक उपनिबंधक थंबोरे साहेब, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे साहेब, राष्ट्रवादी पक्ष तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे, रूद्रय्या स्वामी, सिध्देश्वर कुंभार, प्रसन्न हत्ते, संदीप पंडीत, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, प्रसाद सोनार, आदीत्य पाटील, सोमशेखर अरबाळे, रवी वाघमोडे, संतोष पवार, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


