ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेच्या निमंत्रित कविसंमेलनात विविध कवींच्या सर्जनशील रचनांना रसिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
भाईंदर प्रतिनिधी प्रमोद सूर्यवंशी तेज न्यूज
कविता केवळ शब्दांची सजावट नसते तर ती अंतर्मनातील भावना व्यक्त करण्याची नाजूक, पण प्रभावी भाषा असते. अशाच भावनांच्या छायेत विरघळत आणि शब्दांच्या ओघात झुलत अंतःकरणाचा तळ गाठत भाईंदर (पूर्व) येथील हनुमान मंदिराजवळील सभागृहात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेच्या वतीने आयोजित मराठी भाषेतील निमंत्रित कवींचं कविसंमेलन अत्यंत प्रसन्न वातावरणात साजरं झालं. हा कार्यक्रम रसिकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळेल, याची खात्री आहे.
राष्ट्रपदी पदक विजेत्या सौ. वसुंधरा शिवणेकर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या .कविता हा एक विचार असतो उत्कट भावनांचा आविष्कार असतो. विचार आणि भावना यांच्या संयोगाने कविता जन्माला येते .त्यांच्या विचारपूर्ण मनोगतातून कविता आणि मूल्यसंवेदनशीलतेचं नातं प्रभावीपणे उलगडलं.
या कविसंमेलनात अंबरनाथ , टिटवाळा, नेरूळ, पालघर , चुनाभट्टी,असे लांबच्या ठिकाणाहून कवी कवितेच्या आवडीमुळे आले होते. श्री. मनोहर वाळिंबे, श्री. राजेंद्र सावंत, श्री. जगदीश संसारे, श्री. प्रदीप बडदे, श्री. महेंद्र पाटील,श्री.सुहास परशेट्ये, श्री. प्रमोद सुर्यवंशी,श्री.संतोष धर्मराज मोहिते, श्रीम. अपर्णा पुराणिक, सौ. जयश्री पवार, सौ. कल्पना उबाळे, सौ. सरोज सुरेश गाजरे, सौ.सुनिता महाजन, श्रीम. कल्पना म्हापूसकर, श्रीम. किशोरी पाटील, श्रीम राजेर्षी पवार, सौ. शारदा गावडे, सौ.वसुंधरा शिवणेकर, श्री. विष्णु घोगळे, श्री. पांडुरंग होडावडेकर, श्री. भूपाल चव्हाण, श्री शंकर जंगम या निमंत्रित कवींच्या सर्जनशील सादरीकरणाने उपस्थित रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
. या संमेलनात सर्व सहभागी कवींना सन्मानपत्र, संस्थेचे अध्यक्ष मा. शंकर जंगम यांच्याकडून भेटवस्तू अन्. ‘भक्तिवंदना’ हा आरतीसंग्रह प्रदान करण्यात आला.
संमेलनाचे सूत्रसंचालन मा. भूपाल चव्हाण यांनी नेमक्या शब्दांत केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कवी कवयित्रींचा थोडक्यात परिचय कवयित्री सौ. सरोज सुरेश गाजरे यांनी करून दिला.त्यांनी उपस्थित सर्व कवींच्या सर्जनशील योगदानाबद्दल आस्थेपूर्वक उल्लेख करत, संस्थेच्या सांस्कृतिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्यास ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक अनंत आंगचेकर आणि साहित्यिक पत्रकार मा. राजेंद्र मधुकर सावंत, मा. प्रमोद सूर्यवंशी यांचीही उपस्थिती लाभली. त्यांच्या साहित्यिक दृष्टिकोनातून कार्यक्रमाला विशेष वैचारिक वजन प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष तब्येत बरी नसतानाही श्री.शंकर जंगम आणि कार्यकारिणी सदस्यांच्या यांच्या सहकार्यातून अत्यंत सुबकपणे व नेमकेपणाने करण्यात आले.
भावनांचे पदर उलगडणाऱ्या, मनाला भावणाऱ्या आणि कविता म्हणजे जीवनाचा आरसा असतो, हे पुन्हा एकदा जाणून देणाऱ्या या संमेलनाने भाईंदरच्या सांस्कृतिक वाटचालीत एक हृदयस्पर्शी आणि गौरवशाली पाऊल नोंदवले.


