" माझं घर , माझं घर "
आयुष्यामध्ये आपण आपले आयुष्य जगत असताना बऱ्याचं वेळा अनेकदा कळतपणे किंवा नकळतपणे घराच्या संदर्भात आपण " माझं घर , माझं घर " असा उल्लेख करत राहतो . परंतु प्रत्यक्षात पाहिले तर ते घर फक्त माझे नसून ते घर सर्वांचेच असते . ते फक्त घरात राहणाऱ्या व्यक्तींचेच नसून त्यावर खरा हक्क असतो तो , घरामध्ये वावरणाऱ्या किड्या मुंग्यांचा , झुरळांचा , पालींचा , उंदरांचा , सर्पराजांचा नागराजांचा ..... खरंतर घर हे या सर्वांचेच आणि असंख्य कीटकांचे असते . उलट वेळ आल्यानंतर आपल्याला आपल्याचं घरातून आपल्या चेतना विरहित मृतदेहाला बाहेर काढले जाते , त्यावेळेस घरातील हेचं उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव आपल्यावर कदाचित हसतही असतील .
काल मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता आमच्या घरात पाहुणे म्हणून आलेले सर्पराज व्यवस्थितपणे कोणाला काहीही इजा न करता बाहेर पडताना दिसले . त्यावेळेस मी घरामध्ये नव्हतो , परंतु मला फोन आल्यानंतर मला भीती वाटली नाही , कारण अलीकडे एक वेळेस मला माणसांची भीती वाटते , परंतु प्राण्यांची नाही .
आमच्या घराशेजारीचं राहणारे व माझ्या पाठीमागे असणाऱ्या अदृश्य शक्तींपैकी एक असणारे शेजारी लहान बंधू मित्र श्री. गणेश वाजगे याला फोनवरून मी कल्पना दिली . त्यांच्याच घरातील ऑफिसमध्ये कार्यरत असणारे सर्पमित्र " श्री. अक्षय गोसावी " यांनी सर्प राजाला व्यवस्थितपणे हाताळून निर्जन मनुष्य स्थळी नेवून सोडले . मी घरी आल्यानंतर श्री. अक्षय यांना मानधन देण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यांनी नम्रपणे नकार दिला , शेवटी सर्प राजांचीच इच्छा... सर्पराजांनी मला कोणताही खर्च होवू दिला नाही , त्यांनी कोणाला त्रास दिला नाही , निसर्गाशी जोपासलेला प्रामाणिकपणा व निसर्गाची संगतचं व्यक्तीला आयुष्यभर तारू शकते ... निसर्गावर प्रेम करा , प्राण्यांवर प्रेम करा ...
लेखक - विशाल केशव धट

