पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर - सातारा पालखी महामार्गावरील भाळवणी वाखरी पालखी तळ दरम्यान निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत तसेच रखडलेल्या विकासकामांबाबत आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी शिंदे यांनी निवेदनात असे म्हणाले आहेत की, पंढरपूर सातारा पालखी महामार्गावरील भाळवणी ते वाखरी पालखी तळ या सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील काँक्रीट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी मध्यभागी मोठ्या प्रमाणात चिरा पडलेल्या असून रस्ता दुभागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी गंभीर अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
तसेच या मार्गावरील रोडलाईटचे काम अपूर्ण अवस्थेत असून उपरी येथील मोठ्या पुलाचे कामही दीर्घकाळापासून अतिशय संत गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रवाशांना मोठ्या अडचर्णीना सामोरे जावे लागत आहे.
भाळवणी हे गाव पंढरपूर तालुक्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी बस स्थानकापासून दोन्ही बाजूंनी किमान अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटरपर्यंत फोरलेन रस्ता होणे अत्यंत आवश्यक असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते. परिणामी वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
याचबरोबर पुणे - पंढरपूर पालखी महामार्गाला जोडणारा जुना तोडले बोंडले भाळवणी हा मार्ग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून आषाढी व कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याचाही तातडीने विकास होणे आवश्यक आहे.
तरी आपण वरील सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत अथवा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, ही नम्र विनंती. आपल्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल व भविष्यात होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली आहे .


