नागपूर बदलीनिमित्त निरोप समारंभ; विकासकामे, प्रशासनातील शिस्त आणि लोकसहभागाचा घेतला आढावा
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाल्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथील सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरबद्दलच्या भावना व्यक्त करत, “माझी बदली झाली असली तरी सोलापूर माझ्या मनात कायमस्वरूपी राहील,” असे भावनिक उद्गार काढले.
22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कुमार आशीर्वाद यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगताना, जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण करता आली, असे नमूद केले. या काळात मिळालेल्या प्रेम व सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह महसूल विभाग व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कुमार आशीर्वाद म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांचे यश हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून असते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक त्या सुविधा व रजाही देणे गरजेचे असते. मात्र प्रशासन गतिमान ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक तेवढे कठोर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामकाजाला गती मिळून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळतो.
आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा उल्लेख करताना त्यांनी पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर विमान सेवा सुरू करण्याचे प्रयत्न, आषाढी वारीचे यशस्वी नियोजन, पूर परिस्थितीतील प्रशासनाचे कामकाज तसेच दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. नागपूर येथे बदली झाली असली तरी सोलापूरच्या कोणत्याही कामासाठी आपण सदैव उपलब्ध राहू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यमान जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कुमार आशीर्वाद यांनी उभारलेल्या प्रशासकीय चौकटीचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील कामकाज अधिक सुलभ झाले असून सोलापूरचा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनीही आशीर्वाद यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
समारंभात तहसीलदार मदन जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करत आशीर्वाद यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.
यावेळी विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन कुमार आशीर्वाद यांचा सत्कार केला. सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण निरोप देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर तहसीलचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केले, तर आभार अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मानले.


