सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण भागातील नागरिकांची विविध उपक्रमातून समाजसेवा करणारे वाळूज (ता. मोहोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते सुशिलकुमार मोटे यांना समृद्धी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
समृद्धी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा मंगळवार, दि. ९ जून रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत सुशिलकुमार मोटे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘समाजरत्न पुरस्कार’, सन्मानचिन्ह, शाल व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सुशिलकुमार मोटे हे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची ‘समाजरत्न पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आली होती.
या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास समृद्धी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संध्या पांढरे, उपाध्यक्षा नजमा मुलाणी, सचिव दत्तात्रय पांढरे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


