बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
मौजे शेळगाव (आर) येथील शेतकरी आणि अल्पभूधारक महिला सौ. वैशाली दयानंद बादगुडे यांनी सार्वजनिक हक्कासाठी तसेच सोलापूर/धाराशिव जिल्हा सीमा निश्चितीचा रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी बार्शीतील शिवसैनिकांनी मुंबईत धडक दिली. शिवसैनिक व प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. सुरेशजी बापू गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी जनहिताचा रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत.
या कामासाठी, २४ जून २०२६ रोजी ॲड. सुरेशजी बापू गायकवाड व सहकारी शिवसैनिक दयानंद बादगुडे यांनी माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर प्रशासनाने तात्काळ हालचाली करत दिनांक ०२/०७/२०२६ रोजी प्रत्यक्ष जागेवर शासकीय हद्द कायम करण्यासाठी मोजणी व सीमा निश्चितीची तारीख जाहीर केली आहे.
या प्रकरणातील मुख्य ४ महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
१. दोन जिल्ह्यांची सीमा व दोन स्वतंत्र खंडपीठांचा प्रश्न: मोजणीचे ठिकाण सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर (शेळगाव-वाणेवाडी शिव पानंद रस्ता, बसवेश्वर चौक दक्षिण बाजू, गट नं. २८२) येते. येथे दोन स्वतंत्र उच्च न्यायालयीन खंडपीठांचे अधिकार क्षेत्र येत असल्याने कायदेशीर पेच निर्माण होऊन मोजणी दीर्घकाळापासून रखडली होती.
२. अल्पभूधारक महिला शेतकऱ्याचा लढा- सौ. वैशाली दयानंद बादगुडे या अल्पभूधारक महिला शेतकरी असून, त्यांच्या हक्काच्या रस्त्यासाठी आणि सीमेवरील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा शिवसैनिकांनी हाती घेतला होता.
३. मा. खा.संजय राऊत साहेबांचा तात्काळ फोन व आदेश: शिवसैनिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मा. संजयजी राऊत साहेब यांनी तात्काळ तेथूनच उच्च पदस्थ भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना फोन करून कडक निर्देश दिले. त्यामुळे प्रशासनाला २ जुलै २०२६ ही मोजणीची तारीख निश्चित करावी लागली.
४. पोलीस संरक्षणाची तरतूद: सीमेवरील संवेदनशील परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, मोजणीच्या वेळी शासकीय कामात अडथळा येऊ नये म्हणून मा. संजय राऊत साहेबांनी संबंधित यंत्रणेला पोलीस संरक्षण पुरविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच शासन धोरणानुसार महिला अर्जदाराला विनामूल्य बंदोबस्त मिळणार आहे.
ॲड. सुरेशजी बापू गायकवाड यांच्या खंबीर नेतृत्वामुळे, शिवसैनिकांच्या पाठपुराव्यामुळे आणि मा. संजय राऊत साहेबांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे हा कठीण प्रश्न मार्गी लागल्याबद्दल सौ. वैशाली बादगुडे व स्थानिक शेतकऱ्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

