अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथील कृषिदूतांनी “शेतमाल व प्रक्रिया केलेल्या उत्पादनांच्या विपणनामध्ये मोबाईल ॲप्सचे ज्ञान व उपयुक्तता” या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले. या कार्यक्रमाद्वारे शेतकरी, महिला बचत गट तसेच ग्रामीण युवकांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या उत्पादनांची प्रभावी विक्री कशी करता येते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकामध्ये कृषिदूतांनी विविध कृषी व ई-मार्केटिंग ॲप्सची माहिती देऊन त्यांचा वापर प्रत्यक्ष करून दाखविला. शेतमालाचे दर पाहणे, ग्राहकांशी थेट संपर्क साधणे, ऑनलाइन जाहिरात करणे, ऑर्डर स्वीकारणे तसेच प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचे विपणन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल व्यासपीठांची माहिती देण्यात आली. याशिवाय ई-नाम, कृषी बाजार माहिती ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून बाजारपेठेचा विस्तार कसा करता येतो याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कृषिदूतांनी सांगितले की, डिजिटल ॲप्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाची अचूक माहिती मिळते, मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होते आणि उत्पादनांना योग्य दर मिळण्यास मदत होते. तसेच घरगुती प्रक्रिया उद्योगांद्वारे तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांची ऑनलाइन विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याच्या संधी निर्माण होतात.
या प्रसंगी उपस्थित शेतकरी मोबाईल ॲप्सच्या वापराबाबत उत्सुकता दाखवून विविध प्रश्न विचारले. कृषिदूतांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून प्रत्यक्ष मोबाईलवर ॲप्स डाउनलोड व वापरण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे व विषयतज्ज्ञ प्राध्यापिका एस. व्ही. तरंगे यांचे मार्गदर्शन लाभले. गावातील शेतकरी, युवक व महिला बचत गट सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात डिजिटल विपणनाविषयी जागरूकता वाढून शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांसाठी अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
ॲप ची माहिती देण्यामध्ये कृषी मित्र प्रविण बादल, सागर पवार, करण खाडे, हर्ष देशमुख, अभिषेक नाईकडे, लखन नलवडे व गजानन भोसले यांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली.

