भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी, (ता. पंढरपूर ) शिवसेना विभाग प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते महेश (भैय्या) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अंकल प्रिमिअर लीग (APL) क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सदस्य तथा उबाटा शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
येथील काझी मैदान, कारखाना टप्पा रोड, भाळवणी येथे २३ व २४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस परिसरातील क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटनप्रसंगी संभाजी शिंदे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ₹२१ हजार व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५ हजार व चषक, तृतीय क्रमांकासाठी ₹११ हजार व चषक, तर चतुर्थ क्रमांकासाठी ₹७ हजार व चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेतील सर्व व्यवस्था महेश (भैय्या) इंगोले यांच्या वतीने करण्यात आली असून, प्रवेश शुल्कही ठेवण्यात आलेले नाही.
यावेळी आयोजक, मान्यवर, खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामुळे भाळवणी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे


