मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच पुन्हा एकदा आपला इम्पॅक्ट दाखवून दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच मुंढे थेट ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले असून त्यांनी राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची एक विशेष धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांना कडक इशारा देत प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे.
◼️ *25 मे रोजी स्वीकारला कार्यभार*
अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी नुकताच 25 मे रोजी आपला नवीन कार्यभार स्वीकारला. पदभार हाती घेताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देत सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना तातडीने धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत कडक निर्देश दिले होते.
आयुक्तांच्या या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या यंत्रणेने कमालीची तत्परता दाखवली. त्यानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर, प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर, अस्वच्छ अन्न उत्पादकांवर आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात एकाच वेळी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
◼️ *3 दिवसांत 53 धाडी आणि 33 जणांना अटक*
तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी (Food Safety Officers) राज्यातील विविध संशयास्पद भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले. यामध्ये प्रामुख्याने गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या प्रकरणी एकूण 53 आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाल्याची सर्रास विक्री होत असल्याचे रंगेहात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 25 एफआयआर (FIR) दाखल केले असून गुन्ह्यात सामील असलेल्या 33 व्यक्तींना अटक केली आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी 5 वाहने जप्त करून 27 आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले आहे.
◼️मुंबईत सर्वात मोठी कारवाई
या धडक मोहिमेदरम्यान एकूण 20,57,296 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी सर्वात मोठी आणि मोठी कारवाई बृहन्मुंबई (Mumbai) विभागात पाहायला मिळाली. मुंबई विभागात एकूण 19 आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून या सर्व 19 आस्थापनांना तातडीने सील करण्यात आले आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 19 व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर प्रशासनाने हा मोठा प्रहार केला आहे.
◼️28 लाखांचे खाद्यपदार्थ जप्त
गुटखा आणि पानमसाल्याव्यतिरिक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी आणखी 23 मोठ्या आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये नागरिकांच्या दैनंदिन खाण्यापिण्याशी संबंधित असलेल्या पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नुडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईसक्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन व बेकरी पदार्थांच्या शुद्धतेची तपासणी करण्यात आली.
या कारवाईत सुमारे 28 लाख 78 हजार 572 रुपये किमतीचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे सर्व अन्नपदार्थ असुरक्षित उत्पादन प्रक्रियेद्वारे तयार केले जात होते. जप्त केलेल्या सर्व अन्नाचे नमुने पुढील विश्लेषणासाठी आणि प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


