पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात सांस्कृतिक, कला व वाङ्मय महोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम अलीकडेच संपन्न झाला. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध चित्रकार व साहित्यिक प्रा. डॉ. संजय साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक विभाग प्रमुख व विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून स्वागत केले. यावेळी मंचावर पदव्युत्तर पदवी विभागाचे अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुशील शिंदे तसेच प्रा. सागर नाईक नवरे, प्रा. सचिन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संजय साठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मानवी जीवनात मिळणाऱ्या छोट्या संधींचे परिणाम भविष्यात मोठे असतात. जीवनातील आनंद हा छोट्या गोष्टींतून शोधावा लागतो. कला माणसाला जगण्याचे बळ देते आणि ताण-तणावावर मात करण्यास मदत करते.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कला जोपासण्याचे आवाहन करत जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी महोत्सवाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि कलेचे व्यवसायात रूपांतर करण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून भविष्यात याच विद्यार्थ्यांतून साहित्यिक, कलाकार, संगीतकार व अभिनेते घडतील" असा विश्वास ही त्यांनी यावेळेस व्यक्त केला.
या महोत्सवात महाविद्यालयातील २२ सांस्कृतिक क्लबमधील सुमारे ५५० हून अधिक विद्यार्थी कलाकारांनी सहभाग नोंदविला. विविध २२ कला प्रकारांमध्ये स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते चषक, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके व प्रा. सारिका भांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन युवा महोत्सव समितीचे प्रमुख प्रा. मारुती नायकू यांनी मानले.

