काही माणसं त्यांच्या पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि माणुसकीमुळे मोठी होतात. सरळ आणि स्पष्ट बोलण्यामुळे आदरणीय ठरतात. साहजिकच ते जीवनामध्येही सर्व स्तरावर यशस्वी होतात. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिवारामध्ये आहे त्यांचं नाव आहे श्री. मोहन कदम. परिवाराचे बापू. त्यांचा जीवनप्रवास हा अशाच प्रेरणादायी वाटचालीचा सुंदर नमुना आहे. म्हणूनच १२ मार्च हा त्यांचा जन्मदिवस साजरा करताना आनंद होत आहे आणि अभिमानही वाटत आहे.
होय! मोहन शंकरराव कदम. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील दौंडज या खेडेगावात त्यांचा जन्म. दौंडज गाव आजही पारंपरिक ग्रामीण जीवनशैली जपणारे गाव मानले जाते. शेती, ऊसाची लागवड, पशुपालन आणि ग्रामदेवतांच्या जत्रा - उत्सवामुळे गावातील सांस्कृतिक, सामाजिक जीवन समृद्ध आहे तसेच हा भागही ऐतिहासिक दृष्ट्या पुरंदर किल्ला, जेजुरी आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी जोडलेला प्रदेश आहे. हे विस्ताराने सांगावयाचे एवढ्यासाठीच की असा समृद्ध सामाजिक वारसा लाभलेले आणि एकत्र कुटुंबात सुसंस्कृतपणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळालेले श्री. मोहन कदम जीवनात सर्व स्तरावर यशस्वी न होतील तरच नवल..
मोहन कदम यांचे शिक्षण गाव पातळीवरच झाले. लहानपण अत्यंत कष्टात गेले… परिस्थिती साधी नव्हती. पण त्यांनी परिस्थितीला कधीही शरणागती पत्करली नाही. “*कमवा आणि शिका*” या तत्वावर त्यांनी शिक्षण घेतले, संघर्ष करत करत स्वतःचा मार्ग तयार केला. आपल्या कष्टाच्या बळावर त्यांनी मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन भारत सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या प्रतिष्ठित तेल कंपनीत नोकरी मिळवली आणि प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली.
नोकरीसोबतच समाजाविषयी असलेली त्यांची जाणीव, कळकळ कायम जागी राहिली. समाजसेवेची आवड आणि शेतीबद्दलची जिव्हाळ्याची भावना त्यांनी जपली. गावाकडील मातीशी जोडलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी आपले कुटुंब सर्वार्थाने सक्षम केले. त्यांच्या मेहनतीचे सर्वात सुंदर फळ म्हणजे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षणाने सक्षम केले. एका मुलाला डॉक्टर बनवले आणि संपूर्ण कुटुंबाला सुस्थितीत उभे केले. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सुविद्य पत्नी सौ. सुनिता हिचा प्रत्येक वेळी, पदोपदी मिळालेला सकारात्मक सहयोग यामुळे मी जीवनात यशस्वी ठरलो असे श्री. मोहन कदम बोलता बोलता सहजपणे, प्रामाणिकपणे कबूल करतात.
मोहन कदम आज निवृत्तीनंतरही आनंदाने, समाधानाने आणि स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. त्यांच्या आयुष्याचा प्रवास आपल्याला एकच संदेश देतो – परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, परिश्रम आणि प्रामाणिकपणा असेल तसेच जगण्यातील नियोजन व्यवस्थित केले असेल तर यश नक्की मिळते.
म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिवारातील सदस्यांनी श्री. मोहन कदम यांचा ६४ वा वाढदिवस डॉ. आंबेडकर उद्यानाच्या प्रांगणात मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने, ज्येष्ठ महिलांनी औक्षण करुन संपन्न केला. ज्येष्ठ सदस्य श्री. रमेश पै आणि श्री. रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री शशी जोशी, किरण तामसे, महादेवराव जाधव, जयेश भावसार, विजयराव निंबाळकर, सुभाष हांडे देशमुख यांनी कुशलतेने कार्यक्रमाचे आयोजन करुन वाढदिवस अधिक रेखीव केला.
मोहन कदम यांना वाढदिवसानिमित्त, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील आयुष्यातही असेच आनंदी, प्रेरणादायी जीवन लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. आणि प्रार्थना! अशी उदंड भावना प्रत्येकाने आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.
जीवेत शरदः शतम्*!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा*!
सुभाष हांडे देशमुख
सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिवार, नेरुळ

