पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारीतील पंढरपूर शहरातील गोपाळपूर रोडवरील श्री विष्णुपद मंदिर परिसरात चंद्रभागा नदीपात्रामध्ये आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मुलीबाबत घडलेल्या एका आपत्कालीन प्रसंगात मंदिरातील पुजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना घडली आहे.
करमाळा तालुका (सोलापूर जिल्हा) येथील रहिवासी कु. रोशनी भाऊ काळे ही भाविक मुलगी आपल्या कुटुंबासह श्री विष्णुपद मंदिर येथे दर्शनासाठी आली होती. दर्शनापूर्वी चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेल्यानंतर सदर मुलगी पाण्यात बुडताना आढळून आली. सदर घटना तेथे उपस्थित भाविक व मंदिरातील पुजाऱ्यांच्या निदर्शनास येताच परिस्थितीचे गांभीर्य तात्काळ लक्षात घेण्यात आले.
यावेळी मंदिरातील पुजारी संग्राम कुलकर्णी यांनी कोणताही विलंब न करता प्रसंगावधान राखून तत्काळ चंद्रभागा नदी पात्रात उडी घेत सदर भाविक मुलीस सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यांच्या तत्पर व धैर्यशील कृतीमुळे वेळेत मदत मिळून भाविक मुलीचा जीव वाचविण्यात यश आले.
संग्राम कुलकर्णी यांनी दाखविलेली तत्परता, धैर्य व मानवतावादी भूमिका समाजासाठी अनुकरणीय असून त्यांच्या या स्तुत्य कार्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेबाबत भाविक, नागरिक तसेच विविध स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दूरध्वनीद्वारे पुजारी संग्राम कुलकर्णी यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.

