मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जात आहे. सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला आले असता मनोज जरांगे पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना मराठा समाजालाही व्यसनापासून दूर राहा आणि शेतात भरपूर काम करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे यांनी काल (11 फेब्रुवारी) माचनूर आणि मंगळवेढ्यात दौरा केला. यावेळी खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्गावर थांबलेले दिसून आले.
राजकारण केवळ निवडणुकीपुरते करा, नंतर शेतात भरपूर काम करा, पोरा बाळांना अधिकारी करा
दरम्यान, आपल्याच काही लोकांना माझ्या विरोधात काहीतरी वदवून घेतले जात आहे. पण माझ्यासोबत मायबाप जनता आहे. त्यामुळे मला काही होणार नाही. सरकारने आरक्षण नाही दिले तर एका एकाला पाहून घेईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. राजकारण केवळ निवडणुकीपुरते करा. नंतर शेतात भरपूर काम करा, असे सांगताना आपल्या पोरा बाळांना अधिकारी करण्याचे आवाहन केले. आपली पोर मोठ्या अधिकारी झाली तर पुढचे पन्नास वर्षे आपली चिंता संपेल. आपल्याला सही घेण्यासाठी कोणाच्या दारासमोर जावे लागणार नाही, असेही कळकळीचे आवाहन जरांगे यांनी केले. मी आरक्षण देताना कुठल्या पक्षासाठी काही केले नाही तर सर्वच पक्षातील मराठा समाजासाठी लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल
सातारा संस्थान, मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहे. पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेतली जाणार आहे. सरकारने त्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन करणार, असे सांगितले आहे. मी बैठकीला सुरुवात करणार आहे. सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये 15 लाख नोंदी आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 42 लाख मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार आहे. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत आंदोलन उभं करावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय.

