• मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 700 अधिकारी कर्मचारी नियुक्त
• 309 मतदान केंद्रासाठी 309 कंट्रोल युनिट व 408 बॅलेट युनिट
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ गणासाठी दि.०७ फेब्रुवारी २०२६ रोजी ३०९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीत दोन लाख ८५ हजार ८२७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 700 अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आली असून, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
तालुक्यातील ३०९ मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया रविवारी उमेदवारांच्या व प्रतिनिधींच्या उपस्थित पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पुर्ण करण्यात आली. मतदानासाठी मतदान केंद्रावर 309 कंट्रोल युनिट व 408 बॅलेट युनिट संच तयार करण्यात आले आहेत. तसेच 64 कंट्रोल युनिट व 116 बॅलेट युनिट संच राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी आवश्यकती खबरदारी घेण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष, सहा. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र. एक व दोन तसेच शिपाई अशा 1 हजार 700 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथून मतदान पथकांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 22 टेबलची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त आहे. नियुक्त केलेल्या विशेष वाहनांद्वारे ही पदके नेमून दिलेल्या केंद्राकडे रवाना होतील.
तालुक्यात वाखरी येथील मतदान केंद्र क्रमांक 158 आदर्श महिला मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे तर टाकळी येथील मतदान केंद्र क्रमांक 240 येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच कासेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 285 (निकम वस्ती) हे मतदान केंद्र संवेदनशील मतदान केंद्र असुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दिनांक 07 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. तालुक्यातील सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा असे, आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

