पंढरपूर प्रतिनिधी शिवकुमार भावलेकर तेज न्यूज
तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात येणार्या संत नामदेव महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले असल्याची माहिती अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पालखीतळ मार्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडयाच्या अंतर्गत विभागीय आयुक्त, पुणे यांनी आराखड्यातील मंजूर कामांकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पॅनल गठीत केला आहे. सदर पॅनलमध्ये पुणे येथील क्रिएशन इंजिनिअर कंपनीचा समावेश आहे. नियोजन विभागाच्या दि.12 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखीतळ-मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत संत नामदेव महाराज स्मारकाचे काम काम मंजूर आहे. सदर स्मारक उभारण्यासाठी या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर स्मारकाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, न.पा. मुख्याधिकारी यांच्यासमवेत स्थळपाहणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार कररून तांत्रिक मान्यतेकरिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर यांच्याकडे सादर करावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सदर पत्राच्या प्रती विभागीय आयुक्त, पुणे, विशेष कार्य अधिकारी (तीक्षेवि), उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर, मुख्याधिकारी न. प. पंढरपूर यांना देण्यात आल्या आहेत.
शनिवारी स्थळ पाहणी संत नामदेव महाराज स्मारक स्थळाची पाहणी करण्यासाठी शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी कंपनीचे अधिकारी तसेच शासकीय अधिकारी येणार आहे. यावेळी अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.महेश ढवळे, सचिव रुपेश खांडके, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव अजय फुटाणे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी समाज बांधवांनीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत नामदेव महाराजांचे विद्यमान सर्व वंशज ह.भ.प. नामदास महाराज परिवार व अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी केले आहे.

