शिक्षकांना अशैक्षणिक कामेच अधिक
शिक्षक सध्या वर्गात शिकविण्यापेक्षा अशैक्षणिक कामात अधिक गुंतलेले असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा बट्ट्याबोळ झालाय.आता आणखी एका अशैक्षणिक कामाची जोड शिक्षकांस मिळाली असून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची नोंद करण्याचे काम त्यांच्या माथी मारले गेलय.आता प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी म्हणून एका शिक्षकाची नेमणूक होणार असून शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच विभागातील भटके कुत्रे किती याची देखील नोंद ठेवायचे काम करायचे आहे. सर्वोच न्यायालयाने शाळा परिसर स्वच्छ आणि भटके कुत्रे नागरिकांवर करीत असलेले हल्ले यामुळे शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी याबाबतीत परिपत्रक काढले आहे.खरतर शिक्षक अनेक वर्षापासून निवडणूक कामे, जनगणना कामे, पोलिओ डोस देणे, तंबाखूमुक्त शाळा अभियान, ऑनलाइन कामे अशा कामांत व्यस्त आहेत.त्यामुळे त्यांचा अधिक वेळ या कामांमध्ये जात असल्याने त्यांना विद्यार्थ्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही.अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी आणि नव्याने शिक्षक आणि शिक्षकेतर पदे भरावीत यासाठी शिक्षक संघटना आग्रही आहेत पण शासनाने सर्वच गोष्टींना हरताळ फासला असून शिक्षक सध्या शिकविण्याचे काम सोडून नको त्या कामात त्यांचा वेळ जातोय.
गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व

