३५ तास सलग BMC निवडणूक ड्युटीनंतरही विश्रांती नाही;
मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक ड्युटीवर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टीत तसेच सलग दीर्घ काळ काम करावे लागत असल्याने त्यांना भरपाई स्वरूपात सुट्टी देण्यात यावी, तसेच १६ जानेवारी रोजी निवडणूक ड्युटीवर असलेल्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी मंजूर करावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीच्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री तानाजी कांबळे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली दक्षिण विभाग अध्यक्ष अमित कारंडे यांनी बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी मंत्रालयात प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
निवडणूक ड्युटीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी १४ व १५ जानेवारी रोजी सुमारे ३० ते ३५ तास सलग कामकाज करणार असून, १४ जानेवारी हा मकरसंक्रांत सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतानाही कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी बजावावी लागत असल्याचा मुद्दा या वेळी ठामपणे मांडण्यात आला.
या संदर्भात मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग तसेच मुख्य निवडणूक आयोग (मंत्रालय) येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
सलग ड्युटी आणि सार्वजनिक सुट्टीत सेवा बजावल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा शारीरिक व मानसिक ताण लक्षात घेऊन विश्रांतीसाठी सुट्टी देणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,“निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीची गरज आहे, मात्र त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टीत आणि सलग ३० ते ३५ तास काम करण्यास भाग पाडणे योग्य नाही. मकरसंक्रांतसारख्या सणाच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी करावी लागत असेल, तर त्याची भरपाई स्वरूपात सुट्टी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. १६ जानेवारी रोजी सर्व निवडणूक ड्युटीवर नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे ही मानवी आणि न्याय्य बाब आहे.”
त्याचप्रमाणे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष हेमंत घोरपडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,“निवडणूक ड्युटीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर तसेच नियमित शालेय कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. सार्वजनिक सुट्टीत काम करूनही जर त्याची भरपाई दिली जात नसेल, तर ते अन्यायकारक ठरेल. त्यामुळे निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना भरपाई स्वरूपात सुट्टी देणे आवश्यक आहे.”
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत केवळ निवेदनापुरते न थांबता मंत्रालय पातळीवर थेट पाठपुरावा करण्यात आल्याने, या मागणीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

