पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या भव्य प्रांगणात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वेरीचे संस्थापक व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील राज इंडस्ट्रिजचे टॅलेंट लर्निंग अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय सहसंचालक योगेश खताळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाला सुरवात झाली. स्वेरीचे विद्यार्थी आदित्य मेडशिंगकर, मुग्धा कोरे, वैष्णवी आवताडे, प्रितम बढे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणांतून भारतातील विविध क्षेत्रातील वस्तुस्थिती, युवकांवरील जबाबदारी, भारतीय संस्कृती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आदी विषयावर उत्तम पद्धतीने विचार मांडले. विद्यार्थी गोविंद व ऐश्वर्या यांनी 'भारत हमारी मा है....' हे गीत गायले तर प्राजक्ता दिवेकर यांनी 'तिरंगा माझा श्वास आहे, भारत माझा विश्वास' ही कविता सादर केली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे योगेश खताळे म्हणाले की, 'स्वेरी मध्ये मला आज भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम सर्वांचे आभार मानतो. आज आपणा सर्वांना अभिमान वाटतो की आपण अशा देशाचे नागरिक आहोत, जो देश उत्तरोत्तर चांगली प्रगती साध्य करत आहे. आज आपण जगामध्ये एक सक्षम देश म्हणून पुढे येत आहोत. जगातल्या अनेक देशामध्ये फिरून आल्यावर मला भारतात एक वेगळी सकारात्मकता जाणवते. आज आपण एक तरुणांचा देश आहोत. मानवासाठी जगाला अजून चांगले स्थान बनवण्यासाठी आपण भारतीय लोक अतिशय चांगले योगदान देऊ शकतो.' प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध विभागांच्या संशोधन पत्रिकांचे व 'स्वेरीयन' या त्रैमासिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच 'विकसित भारत २०४७' या अभियानाचा एक भाग म्हणून 'समर्थ विद्यार्थी, समर्थ भारत' या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थी व उपस्थितांना शपथ देण्यात आली.
यावेळी सचिव डॉ. सुरज रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एम.पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी धनवले, किर्ती भोसले व डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर डिप्लोमाच्या विद्यार्थी सचिवा वैष्णवी नवले यांनी आभार मानले.

