पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील सॉफ्टबॉल मुलांच्या संघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली परंपरेला नवी उंची प्राप्त करून दिली आहे. संघाच्या या यशामुळे महाविद्यालयात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, अधिष्ठाता डॉ. बी. एस. बलवंत, डॉ. सुशीलकुमार शिंदे व डॉ. अमोल ममलया यांनी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले. त्यांनी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व सेवक वर्गाने विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संघाने दाखवलेली सांघिक भावना, शिस्त व मेहनत ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी व्यक्त केले.

