पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि कॅडडेस्क, बालाजीनगर, पुणे यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत (एम ओ यु) 'स्ट्रक्चरल ॲनालिसिस अँड डिझाइन युजिंग स्टॅड प्रो' या विषयावर एक आठवड्याचा व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम नुकताच यशस्वीरित्या संपन्न झाला असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
दि.२२ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित या कार्यशाळेत तृतीय वर्ष बी.टेकच्या ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कॅडडेस्क बालाजीनगर पुणेचे श्री. पराग देशमुख यांनी काम पाहिले. विशेष बाब म्हणजे श्री. पराग हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
प्रशिक्षणादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना स्टॅड प्रो सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इमारतींचे स्ट्रक्चरल डिझाइन आणि विश्लेषण कसे करावे, याचे आणि रिअल-टाइम प्रोजेक्ट्सवर आधारित व्यावहारिक ज्ञान देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची मौल्यवान संधी मिळाली.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझाइन पद्धतींची ओळख झाली, ज्यामुळे त्यांच्या करिअरच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम समन्वयक प्रा. गणेश लकडे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

