खेड भोसे प्रतिनिधी तेज न्यूज
शाळेत वेळेवर न येणाऱ्या आणि आलेच तर मावा, गुटखा खाऊन येणाऱ्या शिक्षकाची बदली करण्याच्या मागणीसाठी सुगाव खुर्द येथील पालकांनी शाळेला टाळे ठोकले. अखेर गटशिक्षणाधिकारी यांनी त्या वादग्रस्त शिक्षकाची उचल बांगडी केल्यानंतर पालकांनी शाळा पूर्ववत भरू दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडभोसे (पुनर्वसन), सुगाव खुर्द येते इयत्ता पहिली ते चौथी असे चार वर्ग आहेत. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुख्याध्यापक आणि उपशिक्षक यांच्यावरच या चारही वर्गांची जबाबदारी आहे. येथील मुख्याध्यापक तानाजी पवार आणि वादग्रस्त शिक्षक माधव मारकवाड असे दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत.
येथील वादग्रस्त शिक्षक माधव मारकवाड यांची जुलै २०२४ मध्ये या शाळेवर बदली झाली होती त्यांच्याकडे दुसरी आणि चौथीचा वर्ग आहे. मात्र वारंवार गैरहजर राहणे, शाळेला उशिरा येणे, लवकर जाणे, शाळेत धूम्रपान करणे, मावा - गुटखा खाणे, विद्यार्थ्यांना तंबाखूची पुडी, गुटखा आणायला सांगणे, मोबाईलवर २ - २ तास बोलणे अशा तक्रारी विद्यार्थी तसेच पालक करत होते.
याबाबत पालकांनी संबंधित शिक्षकाला वेळोवेळी समज दिली होती. मात्र या शिक्षकात कोणताही बदल झाला नव्हता. वैतागलेल्या शालेय व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच आणि पालकांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र संबंधित शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
मात्र या शिक्षकाच्या तक्रारी वाढतच चालल्यामुळे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावल्यामुळे आज सरपंच महावीर गायकवाड , उपसरपंच हेमंत देवकर यांनी पालक, महिला पालक यांच्यासह संबंधित शिक्षकाची बदली झाल्याशिवाय शाळा चालू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत शाळेला टाळे ठोकले.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापक तानाजी पवार यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पालक आणि ग्रामस्थ हे या शिक्षकाची बदली झाल्याशिवाय शाळा चालू देणार नसल्याचे सांगत राहिले.
याबाबत गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी दुपारी एक वाजता शाळेला भेट दिली. यावेळी पालक - ग्रामस्थ आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. वादग्रस्त शिक्षकाची बाजू घेणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पालकांनी चांगले झापले, मात्र नरमाईचे धोरण स्वीकारत गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित शिक्षकाची तत्काळ बदली करत असून या ठिकाणी श्री. वास्ते या शिक्षकाची नेमणूक करत असल्याचे पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनीही आंदोलन मागे घेतल्यानंतर दोन वाजता शाळा पुन्हा भरली.
या आंदोलनावेळी माजी सरपंच विनायक देवकर, अंबादास गोफणे, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ पवार, मेघा देवकर, आशा देवकर, तबस्सुम काझी, नंदा पवार, महिला पालक सविता वळेकर, संगीता देवकर, सविता गोफणे, मैना लांडगे, सविता तावरे, अश्विनी लांडगे, जयश्री देवकर, अश्विनी देवकर, अनिता पवार, कोमल देवकर, पुनम देवकर, निलोफर काझी, साळूबाई देवकर, पल्लवी देवकर, रूपाली बेलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

