पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) स्थापन करण्याबाबत नीति आयोगासोबत सामंजस्य करार करण्यात आला.
स्वेरीचे माजी अध्यक्ष कै. दादासाहेब रोंगे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून एसीआयसी साठी नीति आयोग व इतर सहकाऱ्यांचे असलेले योगदान सांगून स्वेरीची स्थापनेपासूनची यशस्वी वाटचाल, संशोधन, तंत्रज्ञान यासाठी मिळालेला निधी, वसतिगृहे आदीबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार यांनी स्वेरीची संशोधन संस्कृती, समाजासाठी व शेतकर्यांसाठी स्वेरीचे योगदान, तंत्रज्ञानातून समाजाचा विकास या बद्दल माहिती दिली. आयआयटी मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हील्स ग्लोबल फाउंडेशनच्या सुजाता नरसिंहन व महेश वैद्य यांनी आपल्या भाषणातून समाजासाठी योगदान देणे गरजेचे असून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून बरेच सामाजिक कार्य करतो. पुढील वाटचालीसाठी आपण एकत्र येऊन अजून चांगले कार्य करू या.’ असे सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख म्हणाले की, ‘नीती आयोगाच्या माध्यमातून समाजातील समस्या सोडविण्यासाठी इनोव्हेशन सेंटर स्थापीत केले जाणार आहे. याद्वारे आपण समाजातील समस्यांचे निराकरण करत राहू. यासाठी आपले उत्पादन, नवनवीन संकल्पना यांना येथे वाव दिला जाणार आहे. आपले उत्पादन हे समाजाच्या उन्नतीसाठी व फायद्यासाठी असेल. अशा उत्पादनाच्या निर्मितीला या केंद्राद्वारे प्रेरणा दिली जाईल.’
सदरचे केंद्र हे अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीति आयोग, भारत सरकार समर्थित आहे. यावेळी स्वेरी व एसीआयसी- स्वेरी पंढरपूर अराईज फौंडेशन यांचा नीति आयोग यांच्या बरोबर सामंजस्य करार करण्यात आला. ‘नीति आयोग’ ही भारत सरकारची धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणारी प्रमुख संस्था आहे. या संस्थेद्वारे नवविचारांना प्रेरणा देणे, या नवीन आयडियांना मूर्त स्वरूप देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे आणि आर्थिक विकास करण्यासाठी नियम बनवत एक सशक्त भारत बनण्यासाठी योग्य दिशा देणे हा आहे. स्वेरीच्या माध्यमातून या केंद्राद्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सुविधा व विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या केंद्राची निर्मिती ही संशोधन आणि विकासाचा एक भाग आहे. हे केंद्र विकसित भारत २०४७ च्या वाटचालीत सहाय्यभूत ठरेल. सदरचे केंद्र हे स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली आकारास येत आहे.
यावेळी अटल इनोव्हेशन मिशनचे नावीन्यपूर्ण उपक्रम प्रमुख वितस्ता तिवारी, दीपाक्षी जिंदाल, गोपाळपुरचे सरपंच पांडुरंग देवमारे, पंढरपूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे, श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील, मोहन पाटील, सचिन वाघमारे, संभाजी शिंदे, सौ. नंदा मोरे, परिसरातील शेतकरी, महिला वर्ग, प्राध्यापक वर्ग तसेच स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष एस. टी. राऊत, सचिव डॉ. सूरज रोंगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त एन.एम.पाटील, धनंजय सालविठ्ठल, एन.एस. कागदे, आर. बी. रिसवडकर, विश्वस्त एच.एम.बागल, बी.डी. रोंगे, विश्वस्त, पदाधिकारी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हर्षवर्धन रोंगे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर सोबस इनसाईट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी यांनी विद्यार्थ्यांना नोकरीवर भर देण्यापेक्षा उद्योजक कसे होता येईल हे सांगून निर्मिती पासून ते मार्केटिंग पर्यंतचे टप्पे सांगितले आणि उपस्थितांचे आभार मानले.
स्वेरी पंढरपूर हे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर असणारे महाराष्ट्रातील पहिलेच केंद्र ठरणार आहे.


