पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाद्वार पोस्ट व मनिषानगर(पंढरपूर), करमाळा टाऊन,सांगोला टाऊन,मंगळवेढा टाऊन ही सब पोस्ट(उपडाकघर) ऑफिसेस बंद किंवा मर्ज करु नयेत अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया
यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य शशिकांत हरिदास यांनी दिली.
भारतातील एक मोठे तीर्थक्षेत्र असलेले पंढरपूर, संत श्री दामाजीपंत यांची पावनभूमी असलेले मंगळवेढा,श्री कमलादेवीचे पवित्र मंदिर व ऐतिहासिक स्थान असलेले करमाळा, तसेच श्री अंबिकादेवीचे स्थान व डाळिंब,बोर, द्राक्षे,इ.फळासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर सांगोला या शहरासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक विकास योजना राबवित आहे. तेथे येणाऱ्या भाविकांना,पर्यटकांना चांगल्या सेवासुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करीत आहे.
तसेच वरील सर्व शहरांचे ऐतिहासिक महत्त्व,विस्तार पाहता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तेथील कार्यालये कमी पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
या सर्व शहरात, परिसरामध्ये व्यापार,उद्योग वाढणार आहेत, तसेच या परिसरात येणाऱ्या भाविकांची,पर्यटकांची संख्याही वाढणार आहे त्यामुळे या ठिकाणी नव्याने अनेक सेवा कार्यालयांची गरज आहे.त्यामुळे सध्या विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा मार्ग परिसरात सुरू असलेले महाद्वार उप डाकघर, शहराचा विस्तार पाहता शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेले मनिषानगर सब पोस्ट ऑफिसची अत्यंत गरज आहे.
तथापि व्यवसायिक द्रष्टिकोन ठेवून (तोट्यात आहेत म्हणून) महाद्वार, मनिषानगर,करमाळा टाऊन,मंगळवेढा टाऊन,सांगोला टाऊन ही उपडाकघरे बंद करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत असे समजते. नागरिकांना शासनाच्या सेवा देताना फायदे -तोटे हा व्यवसायिक विचार नसावा,नसतो अशीच भावना शासनाची असणार आहे.मात्र ही सामान्य नागरिकांच्या अत्यंत विश्वासाची,चांगली सेवा देणारी, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंपोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी ही टपाल कार्यालये बंद करणे योग्य वाटत नाही असेही पत्रात म्हटले आहे.
या शहरांचा विस्तार पाहता पूर्वीपासून या सर्व शहरांमध्ये सुरू असलेली उपडाकघरे चालू ठेवणे ही अत्यावश्यक व गरजेची आहेत.
ही कार्यालये बंद झाल्यास हजारो रिकरिंग डिपॉझिट खातेदार, तसेच सेविंग्ज खाते, महिला सुकन्या समृद्धी योजना, त्याचबरोबर रजिस्टर पार्सल, स्पीड पोस्ट,पावती तिकिटे,पाकिटे इत्यादी मिळणाऱ्या सर्व सेवांसाठी वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक, महिला यांना दूरवर जावे लागणार आहे. टपाल कार्यालयामार्फत असणाऱ्या विविध सेवा वेळेत उपलब्ध होणार नाहीत.
ही सब पोस्ट ऑफिस मर्ज केल्याने त्याठिकाणी गर्दी वाढणार असून ग्राहकांना वेळेवर,सुलभ सेवा मिळणार नाहीत. त्यामुळे अस्तित्वात असलेली उपडाकघरे बंद करण्यात येऊ नयेत याबाबत प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचाली आपण प्राधान्याने लक्ष घालून त्वरित थांबवाव्यात त्यांना स्थगिती द्यावी अशी विनंती ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, जिल्हा सचिव सुहास निकते,महिला विभाग प्रमुख सौ.माधुरी परदेशी, पंढरपूर तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे उपाध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केंद्रीय संचार मंत्री यांच्याकडे करून त्या पत्राच्या प्रती महाराष्ट्राचे चीफ पोस्ट मास्तर जनरल मुंबई तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार प्रणिती शिंदे,व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत.

